आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कार्यालयात प्रंलबित संदर्भ अर्ज, तक्रारी, सेवा यांचा निपटारा तात्काळ होण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आळंदी नगरपरिषदेत बुधवारी ( दि.२१ ) महासेवा दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
सेवा पंधरवडा अंतर्गत विविध सेवा सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या माध्यमातून आळंदीत देखील उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी बुधवारी ( दि.२१ ) आयोजित करण्यात आलेल्या महासेवा दिनात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यालयीन अधीक्षक किशोर ताकास यांनी आवाहन केले आहे. या महासेवा दिनाचे पुणे जिल्ह्यात सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. याच माध्यमातून आळंदी नगरपरिषदेत विविध विभागा अंतर्गत प्रंलबित, नवीन सेवा देण्यासाठी महासेवा दिन आयोजित करण्यात आला आहे.
यात नागरिकांना मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नवीन नळजोड, जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता उतारा, मालमत्ता कराची मागणी देयके देण्यात येणार आहेत. महासेवा दिनास नागरिकांनी आळंदी नगरपरिषद कार्यालयात बुधवारी ( दि. २१ ) सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सेवांचा लाभ घेण्यास उपस्थित रहाण्याचे आवाहान मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी आळंदीकरांना केले आहे.
गुणवंत उपमुख्याध्यापक तात्या गावडे यांचा सत्कार
आळंदी : खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यावतीने जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यामध्ये आळंदी येथील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालय येथील गुणवंत उपमुख्याध्यापक तात्या गावडे, गुणवंत लेखनिक संध्या तोडकर आणि गुणवंत सेवक म्हणून श्रीमती द्वारका चव्हाण यांचा सत्कार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला.
सोळू येथील मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे गुणवंत मुख्याध्यापक वैभव बेंडाळे यांचाही यावेळी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शैक्षणिक संस्थांमधील गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. अतुल पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. गुणवंत पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे मुख्याध्यापक हनुमंत खैरे, पर्यवेक्षक मोहन पवळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.