भाजपच्या ‘मिशन-४५’ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ मुख्य टार्गेट; भाजप, संघ परिवार कामाला लागले, प्रतापराव जाधवांचे राजकीय भवितव्य काय?
पुरूषोत्तम सांगळे
बुलढाणा – भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथावून लावले असले तरी, भाजपची आगामी रणनीती ही ‘शतप्रतिशत भाजप’ अशीच असल्याने, या रणनीतीत शिंदे गटाला दीर्घकालीन योजनेत काय स्थान आहे? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. भाजपच्या महत्वांकांक्षी ‘मिशन -४५’ अंतर्गत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा जिल्हा दौरा करत, बुलढाण्याचा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याच्या सूचना संबंधितांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे बुलढाण्याचा पुढील खासदार भाजपचाच असेल, असे भाजप, संघ परिवार यांच्या खासगीतील गोपनीय बैठकांत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण होतो. प्रतापराव यांना नजीकच्या काळात ‘कमळ’च हाती घ्यावे लागेल, असे तूर्त तरी जिल्ह्यातील राजकीय चित्र आहे.
केंद्रीय वने व श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी नुकताच बुलढाणा जिल्हा दौरा केला. या दौर्यात त्यांनी, खामगाव, देऊळगावराजा येथे भाजप व संघ परिवारातील व्यक्तींशी खासगीत चर्चा केल्या. खामगाव व देऊळगावराजा तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली व उपस्थितांना मार्गदर्शनही केले, असले तरी त्यांच्या दौर्याचा मूळ हेतू हा मिशन -४५ हाच होता. कोणत्याही परिस्थितीत भाजपला त्यांचा पुढील खासदार हा बुलढाण्यातून भाजपचाच हवा आहे. खामगाव येथे बोलताना त्यांनी, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील भावी खासदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देणाराच असेल, असे त्यांनी नीक्षून सांगितले. याचा अर्थच, विद्यमान खासदार मोदी यांना साथ देणारा नाही का? असा प्रश्न निर्माण करणारा होता. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा प्रतापराव जाधव यांच्यावर ”ते आपले आहेत”, म्हणून विश्वास नाही का? असा संशय निर्माण होतो. त्यांना पुढील खासदार भाजपचाच हवा असेल, आणि तोही मूळ भाजप पक्षाचाच हवा असेल तर मग आकाश पांडुरंग फुंडकर किंवा संजय कुटे या संघ परिवाराशी नाळ जुळलेल्या युवा नेतृत्वाला ती संधी मिळू शकते, असेही भाजपचे अंतर्गत सूत्र म्हणते आहे.
केंद्रीय मंत्री यादव यांनी या दौर्यात एकूण दोन गोपनीय बैठका घेतल्यात. खामगावातील बैठकीत फक्त भाजप कोर कमिटीचे नेते, संघ परिवारातील काही व्यक्ती यांचा समावेश होता. या बैठकीचा तपशील बाहेर आला नसला तरी, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे निर्देश व वरिष्ठांच्या सूचना त्यांनी संबंधितांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यासाठीची रणनीती व वातावरणनिर्मिती करण्यास त्यांच्याच या सूचनेनुसार भाजपने सुरुवातदेखील केली असल्याचे भाजपच्या अंतर्गत सूत्राने सांगितले. देऊळगावराजा येथे उदयकुमार छाजेड यांच्या निवासस्थानीही एक गुप्त बैठक झाली. या बैठकीतही त्यांनी संबंधितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणाराच खासदार हवा, असे स्पष्ट करून आतापासून केंद्राच्या कल्याणकारी योजना, मोदी सरकारची कामगिरी घरोघरी पोहोचवा, असे निर्देश संबंधितांना दिलेत. श्रीराम मंदीर, जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविणे, पंतप्रधान मोदी यांची जनमाणसातील प्रतिमा या भाजपसाठी अनुकूल बाबी असल्याने त्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा होईल, त्यादृष्टीने तयारीला लागण्याचेही त्यांनी संबंधितांना सांगितले.
वास्तविक पाहाता, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा भाजपचाच आहे. या मतदारसंघात रा. स्व. संघाचे कार्य व नेटवर्क मोठे आहे. भाजप-शिवसेना युती असल्याने संघाने नेहमीच शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी आपली ताकद खर्ची केली. यावेळी तशी मानसिकता संघ परिवाराची नसून, त्यांना भाजपचाच खासदार हवा आहे.
यापूर्वी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात तीनवेळा भाजपने निवडणूक लढवलेली आहे. त्यात एकदा विजय तर दोनवेळा पराभव झालेला आहे. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे. जेव्हा भाजप-नसंघाने पराभवाचे तोंड पाहिले, तेव्हा बुलढाणा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता बुलढाण्यात काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. त्यामुळेच तब्बल तीन दशकानंतर भाजपने बुलढाण्यावर दावा केला आहे. भाजपच्या मिशन-४५ मध्ये बुलढाण्याचा समावेश आहे, आणि ही बाब शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी तशी धोक्याची घंटा आहे. २०२४ मध्ये भाजपला बुलढाण्यातून स्वतःचा खासदार हवा आहे, हे यापूर्वी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनीदेखील स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपच्या ‘मिशन- ४५’ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अग्रक्रमावर आहे. इथं पुढचा खासदार भाजपचा असेल असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केला होता. प्रभारी रावसाहेब दानवे, खासदार अनिल बोंडे यांनी याचा बुलढाण्यात पुनरुच्चार केला होता. आता केंद्रीय मंत्री येऊन तेही हेच सांगून गेलेत. भाजपची राजकीय रणनीती यशस्वी झालीच तर तब्बल ३३ वर्षानंतर बुलढाण्यात कमळ फुलेल. या सर्व राजकीय घडामोडीत आपले स्थान काय आणि कुठे असेल? याचा विचार आता प्रतापराव जाधव यांनी करण्याची वेळ आलेली आहे.
(लेखक हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक तथा राज्यातील ज्येष्ठ पत्रकार/संपादक आहेत.)