पुणे (युनूस खतीब) – पुणे ग्रामीण परिसरातील नांदेड सिटी येथील एका स्पा सेंटरमध्ये चाललेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत स्पा सेंटरचे मालक, दोन मॅनेजर व तीन महिला यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय व अनैतिक प्रकार चालू देणार नाहीत, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ठणकावलेले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे ग्रामीण परिसरातील नांदेड सिटी येथील डेस्टिनेशन सेंटर येथील ‘ब्लू बेरी स्पा’ येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे. त्याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक विजयसिंह चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीबाबत खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. चव्हाण यांनी माहिती घेऊन सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो असे खात्रीलायक समजले. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांच्या आदेशाने त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी रवाना झाले. त्यांनी तेथे छापा टाकून सेंटरचे मालक, दोन मॅनेजर व तीन महिला यांना ताब्यात घेतले. योगेश पवार (रा. नांदेड गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे), मुंजा शिंदे (रा. वडगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे), अथर्व उभे (वय १९ वर्षे, रा. धायरी, बेनकर वस्ती, तालुका हवेली, जिल्हा पुणे) व दोन महिला या आरोपींच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही स्वतः पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि चौहान, पोउपनि सुधीर घुले, पोउपनि अभिजित सावंत, सपोउपनी जितेंद्र शेवाळे, पोहवा महेश गायकवाड, मपोहवा बांबळे , मपोहवा कांबळे , मपोहवा दुर्गाडे यांनी केली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे वेश्या व्यवसाय कुठेही सुरु असेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही गय केली जाणार नाही, असे डॉ . अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सूचित केले आहे.