चिखली (एकनाथ माळेकर) – जास्तीत जास्त शेती उत्पन्न घेण्यासाठी शेतकर्यांनी पीकपद्धतीत बदल केला. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला. पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती कराल, तर नुकसान होणारच. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर झाडे लावावीच लागतील, अशा प्रकारचा सल्ला प्रसिद्ध हवामान व कृषीतज्ज्ञ पंजाबराव डख पाटील यांनी दिला.
शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकर्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त देऊळगाव घुबे येथे शेतकरी संघटनेचा जिल्हा मेळावा पार पडला. याप्रसंगी उपस्थित शेतकरी, ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना डख बोलत होते. या जिल्हा मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुळेअण्णा सोशल फाउंडेशनचे प्रवर्तक रमेशअण्णा मुळे हे होते. तर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणराव वडले, विदर्भराज्य जनआंदोलन समितीचे वाशिमचे अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव घाडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील कणखर, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशसिंह चौहान, एकनाथ पाटील थुट्टे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास पाटील कणखर, माजी पंचायत समिती सदस्या उषाताई थुट्टे, स्वतंत्र भारत पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद सारडा, शेतकरी संघटनेचे शेगाव तालुकाप्रमुख डिगांबर चिंचोले, देऊळगावराजा तालुका प्रमुख तेजराव मुंढे यांच्यासह माजी सभापती तथा शेतकरी नेते भानुदास घुबे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.मेळाव्याचे प्रास्ताविक भानुदास घुबे यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील खरात यांनी केले. लक्ष्मणराव वडले, देवीदास पाटील कणखर, समाधान पाटील कणखर यांचीही याप्रसंगी भाषणे झाली.
याप्रसंगी ज्यांना ऐकण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात आले होते, ते हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख पाटील यांचे व्याख्यान झाले. त्यांनी शेतकर्यांना पाऊस व शेतीपिकांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, सिमेंटचे रस्ते बनल्याने तापमान वाढले आणि एकूणच निर्सगाचा समतोल बिघडला. आम्ही झाडे तोडली पण लावली नाही. त्यामुळे पाऊसमान बिघडले आहे. त्यामुळे आपल्याला झाडे ही लावावीच लागतील, असे सांगून ते म्हणाले, की पाऊस येण्याची काही लक्षणे आहेत, दिवस मावळत असताना आकाश तांबडे झाले तर ७२ तासांत पाऊस येतो, गर्मी वाढल्याही पाऊस येतो. चिमण्यांनी धुळीत आंधोळ केल्यास ७२ तासांत पाऊस येतो, जेव्हा पावसाचे ढग वाहताना विमानासारखा आवाज येतो,तेव्हा पाऊस येणार असे निश्चित समजावे. तसेच, विजा पडताना नाराळाचे झाड, आंब्याचे झाड, मंदिराचा कळस व जनावरे यावर वीज पडण्याचे प्रमाण मोठे असते, वीज पडताना लाकडावर किंवा गवताच्या पेंढीवर उभे राहिल्यास अंगावर वीज पडण्याचा धोका टळतो. पायाळू माणूस म्हणून त्याच्या हाता-पायात तांब्याचे कडे घालणे धोकादायक असून, त्यामुळेच त्याच्या अंगावर वीज पडते, असेही पंजाबराव डख यांनी सांगून, उपस्थित ग्रामस्थांना हवामान, पाऊसपाणी, शेती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.