– रूग्ण, वृद्धांचे अतोनात हाल, खोल्हापूर वसतीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही!
औरंगाबाद (संदीप गायके) – कन्नड तालुक्यातील सुंदर रमणीय अशा वातावरणात वसलेल्या नागापूरपासून साडेपाच किलोमीटर अंतरावरील अंतूर किल्ल्याकडे जाण्याकरिता रस्ताच नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे व त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता रस्त्यांची उपलब्धता करण्याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केलेले आहेत. हे आदेश धाब्यावर बसवून येथे रस्ता केला जात नाही. हा रस्ता होईल अशी खोल्हापूर वस्तीच्या लोकांमध्ये आतुरतेची भावना असून, ऐतिहासिक स्थळी खोल्हापूर हे छोटेसे गाव वसलेले आहे. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वृद्ध, विद्यार्थी यांच्यासह ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहे.
ऐतिहासिक अशा पावण जागेवरती अंतूर किल्ल्याकडे जाणारी गावांची वसती वसलेली आहे. कित्येक वर्षापासून या वसतीच्या लोकांची दुरवस्था रस्त्याच्या अभावामुळे आहे. खोल्हापूर या वसतीपर्यंत कोणतीही गाडी व बस जात नाही. एखाद्या व्यक्तीला प्रथम उपचारासाठी न्यायचे तर त्याला डोक्यावर उचलून घेऊन जावे लागते, अशी दयनीय अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे.
लोक वसती असूनसुद्धा कन्नडच्या आमदारांचे या वसतीच्या विकासाकडे दुर्लक्ष असून, रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल तर लोकप्रतिनिधी मूग गिळून बसलेले आहेत. लोकप्रतिनिधींचे या गंभीरप्रश्नी लक्ष वेधावे याकरिता वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव व पदाधिकारी यांनी या वसतीला भेट देत तेथील रस्त्याच्या दुरवस्थेचा आढावा घेतला. येणार्या दिवसांमध्ये जर या वसतीकडे जाणार्या रस्त्याचे काम चालू झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी यांच्यामार्फत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपाध्यक्ष यांनी दिला. संबंधित अधिकार्यांना फोन केला असता, येणार्या दहा दिवसाच्याआत कामाची सुरुवात होईल, असेही आश्वासन कार्यकारी अभियंता शिंदे यांनी दिले आहे.
——————