AURANGABADHead linesMarathwada

आंबेडकरी चळवळीचा धगधगता ज्वालामुखी शांत; पँथर नेते, माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे निधन

– चळवळीचा ढाण्या वाघ, नामांतर लढ्यातील सेनानी हरपल्याने आंबेडकरी समाजावर शोककळा!

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ, विद्यापीठ नामांतर लढ्यातील अग्रणी सेनानी, माजी परिवहन राज्यमंत्री तथा पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गंगाधर सुखदेव गाडे (वय ८७) यांचे आज (दि.४ मे) पहाटे साडेचार वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध एशिएन हॉस्पिटल येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा धगधगता ज्वालामुखी शांत झाला आहे. त्यांचे पार्थिव रविवार, दिनांक ५ मेरोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा पीरबाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच दुपारी ४ वाजता अंत्यविधी केला जाणार आहे.
गंगाधर गाडे, रामदास आठवले व इतर नेते हे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समवेत.

गंगाधर गाडे यांनी आंबेडकरी चळवळ जीवंत ठेवण्यात मोलाचे योगदान दिले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, हा नामांतराचा पहिला ठराव त्यांनी मांडला होता. तसेच, औरंगाबाद शहरात ४७ दलित वसाहती त्यांनी वसविल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वाहनांचा ताफा अडविण्यासाठी आक्रमक झालेल्या गाडे यांनी पोटच्या पोराला मुख्यमंत्र्यांच्या गाडीपुढे फेकून देत मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली होती. अभ्यासपूर्ण भाषण, आणि आक्रमक स्वभाव यामुळे सत्ताधारीवर्गाला ते अक्षरशः घाम फोडत असतं. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील अनेक नेते, कार्यकर्ते यांनी त्यांच्या निवासस्थानकडे धाव घेतली होती. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनीही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी-गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे.
गंगाधर गाडे यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९४७ रोजी कवठाळ, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथे झाला होता. दहावीनंतर ते १९६५ ला मिलिंद महाविद्यालयात आले होते. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना नेतृत्वाची आवड होती. विद्यार्थी चळवळीतील आंदोलनानंतर १९७२-७३ मध्ये त्यांनी दलित पँथरमध्ये राजा ढाले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. शहरातील बहुतेक मागासवर्गीय वसाहती त्यांनी वसविल्या होत्या. आंबेडकरी चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता. आणीबाणीच्या काळात त्यांना आठ महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता.छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी भारतीय दलित पँथरच्या स्थापनेत पुढाकार घेतला. १९९९ मध्ये त्यांना परिवहन राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती. त्या काळात त्यांनी एसटीसाठी उल्लेखनीय कार्य केले. सध्या ते पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना करून शैक्षणिक कार्य केले आहे. सध्या त्यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा सिद्धांत गाडे आणि सून भावना गाडे या शिक्षण संस्थेची धुरा सांभाळत आहेत.


गंगाधर गाडे यांना गत ५ वर्षांपासून अल्झायमरने ग्रासले होते. त्यांच्यावर येथीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नियमित तपासणी आणि उपचारासाठी त्यांना शुक्रवारी शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज पक्ष कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, उद्या रविवारी सायंकाळी नागसेन परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!