विवाह सोहळ्यात ‘लेक माझी’चा जागर; जिल्हा प्रशासनाकडून वधुपित्याचा सन्मान!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ‘लेक माझी’चा गजर करणार्या निमंत्रण पत्रिकांची वैविध्यपुर्ण मालिका, प्रवेशद्वारावर स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील नामवंत कवींच्या लेकीवरील गाजलेल्या कविता, प्रत्येक स्वागत फलक अन् कमानींवर ‘लेक माझी’चा संदेश, बोहल्यावरही ‘लेक माझी’ची सजावट, मेहंदी-हळदी-रांगोळी-सप्तपदी.. अशा वैवाहीक विधीत प्रत्येक ठिकाणी ‘लेक माझी’चा अनोखा जागर. लेकीविषयी सकारात्मक संदेश देणार्या एका बहुचर्चीत विवाह सोहळ्याची दखल बुलढाणा जिल्हा प्रशासनानेही घेवून.. ‘लेक माझी’ ही संकल्पना सोहळ्यातून साकारणारे वधुपिता तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांचा सन्मान मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी कार्यरत पीसीपीएनडीटी.च्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या सभेत प्रशासनाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी केला.
अप्पर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेच्यावतीने राबविण्यात येणार्या व ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश देणार्या गर्भधारणापुर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा शुक्रवार ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना होत असतांना, सामाजिक स्तरावर प्रबोधनात्मक पध्दतीने काम होण्याची अपेक्षा सभाध्यक्षांनी व्यक्त केली असता.. डॉ.सौ. वैशाली गजानन पडघान यांनी २१ एप्रिल रोजी बुलढाण्यात झालेल्या ‘चि.सौ.कां.प्रतिक्षा व चि.संदीप’ यांचा विवाह सोहळ्यातून ‘लेक माझी’चा झालेला जागर, याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी सन २०११ ते २०१४ पर्यंत बुलढाणा जिल्ह्यात राबविल्या गेलेल्या ‘लेक माझी’ अभियानाची माहिती पत्रकार राजेंद्र काळे यांनी देवून.. अशा विविध प्रबोधनात्मक उपक्रमांनी १२ वर्षांपुर्वी असलेला ८२७ हा मुलीचा जन्मदर आता मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात ९५४ पर्यंत वर आल्याचे सांगितले.
बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जन्मभूमी असून, बुलढाणा शहर हे स्त्री-पुरुष समानता निबंध लिहीणार्या ताराबाई शिंदेंचे असल्यामुळे या जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने स्वयंस्फुर्तीने काम करण्याची अपेक्षा यावेळी सदाशीव शेलार यांनी व्यक्त केली. या बैठकीत त्यांनी विवाह सोहळ्यात ‘लेक माझी’ चा झालेल्या जागराबाबत कौतूक केले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण घोंगटे, कायदे सल्लागार अॅड.वंदना तायडे यासह जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी व तेराही तालुका स्तरावरील वैद्यकीय अधिकारी तथा पीसीपीएनडीटी.चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
‘लेक माझी’ ही संकल्पना घेऊन वैवाहिक सोहळ्याला साहित्यिक व सांस्कृतिक झालर चढवत पारंपारिकता अन् आधुनिकता यांचा सुंदर समन्वय साधून मातृतीर्थ बुलढाणा शहरात पत्रकार राजेंद्र काळे यांच्या मुलीचा झालेला विवाह सोहळा ऐतिहासिक ठरला तो, फुलांनी सजवलेल्या क्रेनमधून ६५ फूट उंचीवर जात साजरा झालेल्या शिवविवाहाने ! संगम चौकातील भव्यदिव्य शिवस्मारक स्थळी २१ एप्रिलला मावळत्या सूर्याच्या साक्षीने ‘चि. सौ.का.प्रतिक्षा व चि.संदीप’ यांच्या वैवाहिक आयुष्याचा सूर्योदय झाला. क्रेनच्या झुल्यातून आकाशाकडे झेपवत गगनचुंबी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सद्यस्थितीतील भारतातील सर्वाधिक उंच पुतळ्याला पुष्पाभिषेक करत शिवसाक्षीने त्यांनी मुहूर्त साधला. तर तिकडे निवांत लॉन्सवर ‘लेक माझी’चा जागर करत भरगच्च उपस्थितीत मंगलध्वनीच्या गजरात साजरा झालेला पुढचा विवाह सोहळा संस्मरणीय ठरला. स्वागतपथावर लावलेल्या लेकींविषयीच्या कवितांचे फलक लक्षवेधी होते, वृक्षारोपण करून हळद समारंभ तर पक्षी तृष्णापात्रामध्ये ‘एक लोटा जल’ टाकून संगीत सोहळा.. हेही आधीचे पर्यावरणपूरक वैशिष्ट्य. डीजे.च्या ऐवजी सनई चौघड्याचा निनाद व बासरीची धून तथा शिवकालीन तुतारी, मशाल व मराठमोळ्या नऊवारीतील महिलांनी केलेले औक्षण लक्षवेधी होते.. मतदान करून लोकशाहीच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन नवदाम्पत्याने केले.