अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे; रूग्णाच्या जीवाशी खेळ सुरू!
– अंढेरा सरपंच संतापल्या, दिला उपोषणाचा इशारा!
अंढेरा (हनिफ शेख) – देऊळगावराजा तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे तसेच ग्रामीण भागातील सर्वात मोठे म्हणून ओळख असणारे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे आज, दि.४ मेरोजी सायंकाळी सहा वाजता बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अंढेरा येथील रवींद्र लक्ष्मण सानप हे त्यांच्या दीड वर्षाच्या देवांश नावाच्या चुमरड्याला ताप आणि हगवण लागल्याने उपचार घेण्यासाठी अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता, प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद स्थितीत आढळून आल्याने, आरोग्य विभागाची अनस्था चव्हाट्यावर आली. आरोंग्य केंद्र बंद ठेवणार्या वैद्यकीय अधिकार्यावर तातडीने कारवाईची मागणी पुढे आली आहे.
आरोग्य केंद्र बंद असल्याबाबत रवींद्र लक्ष्मण सानप यांनी अंढेरा गावाच्या सरपंच सौ.रूपाली रामदास आंबिलकर यांना कळवले असता, सरपंचांनी तात्काळ अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून झालेल्या गैरप्रकारांबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आकांक्षा गाडेकर यांना फोन करून सदर प्रकाराबाबत जाब विचारला. येथे दिवसा कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद शिंगाडे तसेच शुभांगी गवई नावाच्या नर्स ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र वार्यावर सोडून निघून गेल्याने सदर प्रकार उघडकीस आला. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आकांक्षा गाडेकर यांना सदर प्रकाराबाबत विचारणा केली असता, आज देऊळगावराजा येथे एनसीडीएक्सचे प्रशिक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. काही महिलांचे प्रशिक्षण असल्यानचे शीतल उंबरहांडे यांना सायंकाळी अंढेरा येथे येण्यासाठी उशीर होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. तसेच सदर प्रकार गंभीर असून, कर्तव्यात कसूर करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना बोलताना त्यांनी दिली.
अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असो किंवा इतर कर्मचारी हे नेहमीच आपल्या कर्तव्यात कसूर करत असून, वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी यांना वेळोवेळी सांगूनही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आता स्वतः मीच उपोषणाला बसणार आहे.
– सौ.रुपाली रामदास आंबिलकर, सरपंच, अंढेरा
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे तापमानाने उच्चांक गाठला असून, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींनासुध्दा उष्णतेमुळे त्रास होत आहे. अचानक उष्माघाताने रुग्ण दगाऊ नये म्हणून आरोग्य विभागाने सतर्क राहायला पाहिजे असताना, अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीच बंद करून वार्यावर सोडले असल्याने गोरगरीब रुग्णांनी उपचार तरी कुठे घ्यावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अंढेरा येथील रूग्णवाहिकाही गायब!
अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणार्या दोन रूग्णवाहिका चक्क कित्येक दिवसांपासून गायब असून, ज्या ठिकाणी त्या उभ्या असतात, त्या ठिकाणी चक्क सिमेंट बॅग टाकलेल्या आढळल्या. तसेच रूग्णवाहिकेवरील चालकही अंढेरा येथे येत नसल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य सेवा ही अत्यावश्यक असताना अंढेरासह परिसरातील जनतेच्या जिवाशी खेळले जात असल्याचे दिसून आले. अंढेरा हे महामार्गावर असून, एखादा अपघात झाला, िंकवा एखादी महिला बाळंतपणासाठी अडली तर तात्काळ उपचारासाठी रूग्णवाहिका अंढेरा येथे उपलब्ध पाहिजेत. परंतु, येथील दोनही रूग्णवाहिका गायब झाल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. या रूग्णवाहिका तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, देऊळगावराजा येथे जमा असल्याचे निदर्शनास आले. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांना विचारणा केली असता, यापुढे नियमितपणे रूग्णवाहिका अंढेरा येथे उपलब्ध राहतील, असे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
———-