– साईडपट्ट्या भरल्या न गेल्याने पादचारी, दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात!
देऊळगाव घुबे ता.चिखली (राजेंद्र घुबे ) – मलगी ते इसरूळ या रस्त्याची काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने थातूरमातूर दुरूस्ती केली. परंतु साईडपट्ट्या न भरल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. अनेक दुचाकीस्वारांचे अपघात घडत असून, बांधकाम विभाग एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहात आहे का? असा संतप्त सवाल या रस्त्यावरील गावांतील ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. या रस्त्याचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
साईडपट्ट्या भरल्या नसल्याने अपघात वाढले आहेत.सविस्तर असे, की मलगी ते इसरूळ रस्त्याने दररोज शेकडो वाहने ये जा करतात. परंतु रस्त्याच्या साईडपट्ट्या रूंद नसल्याने व त्या भरल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे दुचाकी वाहने, पायी चालणारे पादचारी यांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या रस्त्याची किरकोळ दुरुस्ती केली गेली. परंतु परत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेला गिट्टी, वाळू इत्यादी अनेक ठिकाणी विखुरलेले असून, त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. हा रस्ता धोकादायक बनला असून, रात्रीच्यावेळी अवैध रेतीतस्करी करणारे वाहने या रस्त्याने सुसाट धावतात, त्यामुळे रात्रीच्यावेळी दुचाकीचा प्रवास म्हणजे मरणाला आमंत्रण ठरते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित मलगी ते इसरूळ या रस्त्याचे नूतनीकरणासह डांबरीकरण करावे, अशी मागणी देऊळगाव घुबे, पिंपळवाडी, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, इसरळ, मंगरूळ, अंचरवाडी या गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या गावांतील ग्रामस्थांनी दिलेला आहे.