साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा ते लव्हाळा रस्त्यावरील कोराडी नदीच्या पुलाचे बांधकाम अतिशय निकृष्टदर्जाचे झालेले असून, या पुलावरील लोखंडी सळया उघड्या पडल्याने बारा महिन्यांतच या पुलाच्या कामाची वाट लागली आहे. निकृष्ट काम करणार्या ठेकेदार आणि संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
साखरखेर्डा ते लव्हाळा रस्त्यावरील भोगावती, कोराडी आणि एका नाल्यावरील पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सात कोटी रुपये मंजूर केले होते. त्या कामाची सुरुवात ढिसाळ पध्दतीने सुरु झाली होती. या कामाच्या दर्जाबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला होता. परंतु, काम होणे आवश्यक असल्याने या कामात दिरंगाई होऊ नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी संबंधित अधिकार्यांना पत्र लिहून कामाचा दर्जा तपासून घ्यावा, असे प्रतिपादन केले होते. परंतु, संबंधित अधिकार्यांनी कामाच्या चाचणीची तपासणी न करता कामाला सुरुवात केली. भोगावती नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोराडी नदीवरील पुलाचे काम थातूरमातूर करून कठड्याचे काम तसेच बाकी ठेवले होते. पुलाचे काम पूर्ण होऊन बाराही महिने झाले नाही तोच पुलावरील टाकलेला भराव उखडून लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. रात्रीच्यावेळी मोटारसायकलमध्ये लोखंडी सळई अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट दर्जाचे पुलाचे काम करणार्या संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तेजराव देशमुख यांनी केली आहे.
रस्त्याच्या कामाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता संतोष आढाव यांच्याकडे असतांना, त्यांना याबाबत अनेक वेळा सूचना देऊनही कोणतीच दखल घेतली गेली नाही . त्यामुळे या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किती बेजबाबदार आहे, हे यावरून स्पष्ट होते . याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.