पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – आज (दि.३१) श्री गणरायाच्या आगमनासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. याचाच उत्साह राज्यभरातल्या बाजारपेठांमध्येही दिसून आला आहे. गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दीच गर्दी बाजारपेठांमध्ये दिसून आली. कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त असा गणेशोत्सव साजरा होत असल्याने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण होते. परंतु, प्रचंड वाढलेल्या महागाईने ग्राहकवर्ग संतापही व्यक्त करताना दिसून आला.
बुधवार म्हणजे ३१ ऑगस्टरोजी गणेश चतुर्थीला सुरुवात होत आहे. संपूर्ण देशात घरोघरी श्री गणेशाचे आगमन होईल. १० दिवसांचा हा उत्सव अनंत चतुर्दशी रोजी संपेल. या वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव असेल. गेल्या दोन वर्षात करोनाच्या निर्बंधामुळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करता आला नाही. पण या वर्षी निर्बंध काढून टाकण्यात आल्याने उत्सव जोरदार साजरा करण्याची तयारी झाली आहे. गणेश उत्सवासाठी बुधवारी देशातील अनेक राज्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. काही राज्यात बँकांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सात राज्यात बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. अन्य राज्यात बँकांचे काम नियमीत वेळेनुसार होणार आहे.
- – शुभ मुहूर्त –
गणेश चतुर्थी: बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२
गणपती मूर्ती स्थापनेचा मुहूर्त : ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५ ते दुपारी १.३८ स्थापन करता येईल.
चंद्र दर्शन टाळणे : ३० ऑगस्ट दुपारी ०३:३३ ते रात्री ०८:४० पर्यंत आहे.
गणेश विसर्जन तारीख : शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२