Breaking newsHead linesMaharashtra

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढल्या!

– गेल्या चोवीस तासांत पुन्हा दोन शेतकरी आत्महत्या

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर, शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा राज्यात गंभीर बनला आहे. मंत्रालयात उस्मानाबादेतील शेतकर्‍याने आत्महत्या केल्यानंतर, शेतकरी या सरकारविषयी साशंक असल्याचे चित्र निर्माण झाले असून, दुर्देवाने शेतकरी आत्महत्यांत राज्याचा पहिला क्रमांक दिसून आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्डच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यानंतर तामिळनाडू व मध्यप्रदेशचा क्रमांक लागतो. २०२१ मध्ये महाराष्ट्रात २२ हजार २०७ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्या खालोखाल तामिळनाडूत १८ हजार ९२५ शेतकरी आत्महत्या झाल्यात. तर देशाचा विचार करता, देशात एक लाख ६४ हजार ०३३ शेतकरी आत्महत्या घडल्या आहेत.

गेल्या २४ तासात राज्यात २ शेतकर्‍यांच्या आत्महत्या
मागील २४ तासांत महाराष्ट्रात दोन शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशी दोन शेतकरी कुटुंबाच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला. लातूर जिल्ह्यात गोगलगाय, अतिवृष्टी आणि मोझ्याक व्हायरसमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हताश झालेल्या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. औसा तालुक्यातील उजनी येथे हा प्रकार घडला. अहेमद अजमेर रुईकर असे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याचे नाव आहे. तसेच, अतिवृष्टीने सलग तिनदा पुराचा फटका बसल्यामुळे शेतातील पिक उद्ध्वस्त झाल्याने नैराश्यातून एका शेतकर्‍याने स्वता: च्या शेतातील आंब्याचा झाडाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे उघडीस आली आहे. गोविंदराव महादेव दानी वय ६७ वर्ष असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे.


अतिवृष्टीने व पुरामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याने आर्थिकदृष्टीने खचलेले शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली होती. पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिनात १८ शेतकरी आत्महत्या झाल्या. तर अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या ऑगस्ट महिन्यात दुप्पटीपेक्षा जास्त ३८ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहे. दुर्देवी बाब म्हणजे सर्वत्र पोळा सण साजरा होत असताना पोळ्याच्या तीन दिवसांत नऊ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांना तात्काळ मदतीची गरज असताना मदतीच्या केवळ घोषणा करण्यात येत आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!