नंदूरबार (आफताब खान) – गणेश उत्सवाच्या काळात नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज जिल्ह्यातील संवेदनशील भागात पथसंंचालन करण्यात आले. या संंचालनात जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, गृह रक्षक दल याशिवाय एनसीसी आणि पोलीस मित्र सहभागी झाले होते.
गणेश उत्सव काळात पोलीस दलाच्या वतीने पोलीस मित्र आणि स्वयंसेवकांची ही मदत घेण्यात येणार आहे, तर मुस्लिम बहुल भागात मुस्लिम स्वयंसेवक पोलीस दलाला गणेशोत्सव काळात मदत करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात १२०० पोलीस कर्मचारी ६०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. सोबतच प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ही या बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. तसेच प्रत्येक गणेश मंडळाजवळ पोलीस मित्र आणि स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिली. येणाऱ्या गणेश उत्सव काळात पोलीस दल सज्ज असून सर्वांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आव्हान पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे .