आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयातील शिक्षक अतुल पवार यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. यामुळे दुराफे विद्यालयाचे नावलौकिकात भर पडली.
राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त लोकसेवा प्रतिष्ठान पुणे संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिक शाळा फुलगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यात आळंदीतील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयातील क्रीडा शिक्षक अतुल पवार यांचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दीपक पायगुडे, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक देविदास जाधव, क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे आदी मान्यवरांसह पुरस्कारार्थी उपस्थित होते. अतुल पवार यांना क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल आळंदी परिसरात स्वागत करण्यात आले. येथील श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत खैरे, उपमुख्याध्यापक तात्यासाहेब गावडे, पर्यवेक्षक मोहन पवळे, शाळा व्यवस्थापन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पवार यांच्या कार्याचा गौरव करीत शुभेच्छा दिल्या.