आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ बीव्हिजीच्या या रुग्णवाहिकेत घोणस आढळल्याची घटना रविवारी ( दि.२८ ) घडली. यामुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे परिसरात खळबळ उडाली. नागरिक,रुग्ण यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात असलेली १०८ रुग्णवाहिका स्वच्छता करण्याचे काम सुरु असताना वाहन चालक यांचे लक्षात आले कि, रुग्णवाहिकेत घोणस आहे. रुग्णवाहिका नियमित स्वच्छतेचे काम सुरु असताना ही बाब उघड झाली. रुग्णवाहिकेच्या उघड्या खिडकीतून घोणस आत आली असण्याचा यावेळी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घोणस असल्याचे दिसताच सर्प मित्राना बोलवून घोणस एका बरणीत घेऊन वनात सोडण्यात आली असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी दिली. यात कोणालाही इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेने परिसर स्वच्छता आणि होत असलेली अनधिकृत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटने नंतर तात्काळ परिसर स्वच्छता आणि वाहन पार्किंग बाबत आळंदी नगरपरिषद प्रशासनास स्वच्छता आणि वाहन पार्किंग बाबत दक्षता घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवे व्यतिरिक्त आळंदी ग्रामीण रुग्णालयात वाहने लावू नयेत असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.