अमरावती (ब्रेकिंग महाराष्ट्र) – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजसंस्थापित हरिहतीर्थ या पर्यटन व धार्मिक क्षेत्राचे सौंदर्य श्रावणसरींनी चांगलेच बहरून गेले असून, राज्यभरातील पर्यटकांनी पर्यटनासाठी हरिहर तीर्थावर गर्दी केली आहे.
हरिहर तीर्थाचे ड्रोन कॅमेराद्वारे श्री राजेश रौंदळकर यांनी टिपलेले हे विहंग्यम दृश्य.
मानव सेवेचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे विवेकानंद आश्रमाने हे पर्यटनस्थळ विकसित केले आहे. हरिहरतीर्थ, विवेकानंद स्मारक ही स्थळे पर्याटकांसाठी आनंदाची व निसर्गसौंदर्याची पर्वणी ठरत आहेत. राज्यभरातून येथे पर्यटक दाखल होत आहेत. हरिहराचे ऐतिहासिक मंदीर, वृक्षावेलींनी नटलेली बाग, आणि थुईथुई नाचणारी कारंजी, त्यातच श्रावणसरींनी निसर्गाच्या सौंदर्यात ओतलेली हिरवाई, यामुळे हे पर्यटनस्थळ चांगलेच बहारून गेले असून, मनाला सुखद गारवा देत आहे. पर्यटकांसाठी विवेकानंद जलाशयात असलेली बोटिंगी सोय, शांत व हिरवळीने नटलेला परिसर, आणि पू. शुकदास माऊलींच्या समाधीदर्शनातून मिळणारा उच्चकोटीचा अध्यात्मिक परमानंद, यामुळे पर्यटक येथे येत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी सांगितले आहे.