BuldanaChikhaliVidharbha

मेरा बुद्रूकचे आरोग्य उपकेंद्र बनले दारूड्यांचा अड्डा!

– रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा पडला खच; कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे!
– वैद्यकीय उपचाराअभावी गोरगरिबांचे अतोनात हाल; आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनी तरी लक्ष घालावे!

चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व लवकरच नगरपरिषद होण्याच्या तयारीत असलेल्या मेरा बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्राला कायमस्वरुपी डॉक्टरच नसल्याने, गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील यांचे दुर्लक्ष झाल्याने, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर कुणाचाही वचक नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव होऊनही या उपकेंद्राला डॉक्टर मिळाला नाही, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्रव्यवहार केला तर त्यालाही आरोग्य विभागाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे मेरा बुद्रूक आरोग्य उपकेंद्राचा कारभार सद्या रामभरोसे सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आरोग्य उपकेंद्राच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला असून, हे आरोग्य उपकेंद्र परिसरातील दारूड्यांचा अड्डा बनल्याचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या पाहणीत आढळून आले आहे.
चिखली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारे मेरा बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्राची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. या गावची लोकसंख्या पंधरा हजार असून, या गावाला मनुबाई गुंजाळा, चंदनपूर, दरेगाव ही गावे जुळलेली आहेत. त्यामुळे या सर्व गावांतील ग्रामस्थ प्रथमोपचार घेण्यासाठी मेरा बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्रावर येतात. परंतु, या उपकेंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर नसल्यामुळे गोरगरीब ग्रामस्थांना व शेतकर्‍यांना वैद्यकीय उपचार तर मिळतच नाही; पण नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आज ग्रामीण भागामध्ये शेतकरीवर्गाला निसर्गाच्या अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतामध्ये कामधंदा नाही, आणि प्रथमोपचार करण्यासाठी दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही, अशी अवस्था मेरा बुद्रूक येथील गोरगरीब जनतेची झाली आहे.
मेरा बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या चार वर्षापासून डॉक्टर नाही, शिपाईदेखील नसल्याने येथे कार्यरत औषध निर्माताच रुग्णावर उपचार करतात. या आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. नागरे मॅडम या सुट्टीवर गेल्या आहे. त्या गेल्यापासून या उपकेंद्राला डॉक्टर मिळालेले नाहीत. या गंभीरप्रश्नी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मी स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून करून पाहिला. त्यांची भेटदेखील घेतली; परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी फक्त कागदावर लिहून घेण्यापुरतेच काम केले. जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेमध्ये वेळोवेळी ठराव घेऊनसुद्धा या उपकेंद्राला डॉक्टर मिळाले नाही. तसेच, अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बावस्कर यांच्याशीदेखील याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले, की मेरा बुद्रूक उपकेंद्रात डॉक्टर पांढरे, डॉक्टर जाधव व डॉक्टर मस्के मॅडम यांच्या दोन-दोन दिवसांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. परंतु, यापैकी कुणीही या उपकेंद्रात दिसत नसल्याचे वास्तव आहे.


याप्रश्नी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तर फोनच घेतला नाही. चिखली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सांगळे हे महत्वाचे फोनदेखील उचलत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. डॉ. सांगळे यांचे व्यवस्थापन कोलमडून पडले असल्याचा ठसठसीत पुरावा म्हणजे, मेरा बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्र होय!, या उपकेंद्राच्या आवारात चक्क दारूड्यांनी ठाण मांडले असून, येथे दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला असल्याचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीच आता चिखली तालुक्याच्या गलथान व्यवस्थापनात लक्ष घालावे, व मेरा बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्राला कायमस्वरुपी डॉक्टर द्यावे, अशी मागणी परिसरातील गावांतील ग्रामस्थ करत आहेत. तसेच, चिखली मतदारसंघाच्या आमदार व जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आ. श्वेताताई महाले-पाटील यांनी तरी आरोग्य विभागाच्या गलथान कारभारात लक्ष घालून, त्यांना जाब विचारावा व शिस्त लावावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.


जिल्हा परिषदेच्या नियोजनशून्य, ढिसाळ कारभारामुळे चिखली तालुक्याच्या आरोग्य विभागाचे तीनतेरा वाजले आहेत. गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळत नसून, कुणाचा कुणावर वचक राहिलेला नाही. मेरा बुद्रूक गावाचे आरोग्य उपकेंद्र तर निव्वळ शोभेची वास्तू बनलेले आहे.

– ज्योतीताई पडघान, माजी महिला व बालकल्याण सभापती, जि.प. बुलढाणा
————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!