पिंपरी चिंचवड (युनूस खतीब) – विकत घेतलेल्या फ्लॅटचे खरेदी खत नसल्याने ते करुन देण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर बँकेचे कर्ज काढून एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलाची 1 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.19) तीन जणांवर IPC 406, 420, 120 (ब), 34 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लखमशी कांजीभाई पटेल (वय – 73 रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह चैतन्य कालबाग (वय – 60 रा. तारपाडा रोड, अंबोली, अंधेरी (प), मुंबई), दीपक शिवचरण प्रजापति (वय – 46 रा. ओशिवरा, मुंबई) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2017 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत वाकड येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या मुलाचा विस्टा इम्प्रेस, वाकड येथे फ्लॅट होता. या फ्लॅटचे खरेदीखत फिर्यादी यांच्या नावावर नव्हते. त्यामुळे आरोपींनी फसवणूक करण्याचा कट रचून फिर्यादी यांचा मुलगा विपुल याच्याकडून खरेदीखत करुन घेतले. आरोपींनी फ्लॅट आयसीआयसीआय बँकेकडे गहाण ठेवून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फ्लॅटवर बेकायदेशीरपणे बोजा चढवला.
आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाची 1 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे. एस. गिरनार करत आहेत.