बुलढाण्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बोर्डे यांचं 14 ऑगस्टला निधन झाले. प्रमोददादा बोर्डेसारखा दिलदार पत्रकार मित्र गेल्याचे आम्हा त्यांच्या संपर्कातील मित्रांना दुःख झालं. मात्र त्याहीपलीकडे प्रमोदभाऊंच्या जाण्याची खंत आयुष्यभरासाठी उरात असणार आहे.
दोन्हीही किडन्या फेल झाल्याने प्रमोद दादाची तब्येत झपाट्याने खालावली होती. मधल्या काळात अजीम नवाज राही त्यांना भेटायला गेले. तेव्हा प्रमोद दादा अजीमभाई ला म्हणाला, अजीम एकदिवस तू, समाधान ( अर्थात भाऊ पाटील ), राजेंद्र काळे,प्रकाश सानप आणि सिद्धेश्वर असे तुम्ही मुद्दाम या
दिवसभर गप्पा मारू.
अजीमभाई यांनी हा निरोप आम्हा सर्वांना न चुकता सांगितला. त्यानुसार 9 ऑगस्ट ला धाड येथे त्यांच्या भेटीला जाण्याच निश्चित झालं. त्याच दिवशी आमची देशोन्नती चि खामगाव ला बैठक. मात्र प्रमोद दादा कडे जायचे, गप्पा मारायच्या हा बेत ठरल्याने आणि मेहकरातील एका सभेचे वृत्तसंकलन करण्याची जबाबदारी असल्याने मी बैठकीला न जाता प्रमोद दादा च्या भेटीसाठी आतुर होतो. खरं म्हणजे, आम्ही सर्वजण एकत्रित जमू तेव्हा गप्पांची मैफिल हमखास रंगणार होती,आणि प्रमोद दादा ला त्या दुःखातून काहीकाळ बाहेर काढून पोटभर हसवणार होतो हे तितकेच खरे !
दुपारी 3 नंतर भेटी साठी जायचं, प्रकाश सानप लोणार वरून साखरखेरडा पोहचणार,मी मेहकर वरून साखरखेरडा, तिथून एकाच गाडीत मी आणि प्रकाश सानप अजीमभाई समवेत धाड ला जाणार, राजेंद्र काळे खामगाव चि बैठक आटोपून बुलडाणा येणार,समाधानभाऊ सावळे पाटील आणि राजेंद्र काळे हे दोघे बुलडाणा येथून थेट धाड पोहचणार आणि आम्ही सर्वजण तिथे एकत्रित येऊन प्रमोद दादा सोबत गप्पा करणार हा सगळा बेत आखून तयार, आणि मी प्रकाशभाऊ सानप कुठपर्यंत पोहचले म्हणून त्यांना कॉल केला तर त्यांना ताप आल्याने त्यांनी रद्द केले आणि नंतर ही सगळीच साखळी गळून पडली.
9 ला जाता आलं नाही पण ते 14 ला आपल्यातून निघून गेल्याचा दुर्दैवी निरोप मात्र आमच्या भेटीला येऊन धडकला.
आज त्यांच्या जलदान विधी व रक्षा विसर्जन ला गेलो
पण मला अजीमभाई चे वाक्य माझ्या मनात घर करून राहले
खुलासे अधुरेच राहतात,अन निघून जाण्याची वेळ येते
मित्रानो
आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा असला प्रसंग हमखास येतो. कुणावर तरी आपण छोट्याश्या कारणावरून रागावलेलो ,रुसलेलो असतो. अन एक दिवस तो निघून जातो
कुणाचे तरी आपल्याला कौतुक करायचे असते,त्याच्या पाठीवर थाप मारायची असते,अन तो निघून जातो. कुणा विषयी तरी आपल्याला आपल्या सदभावना- प्रेम व्यक्त करायचे असते,अन तो किंवा आपण निघून गेलेला असतो.
प्रमोद दादा ला देखील आमच्या सोबत व्यक्त व्हायचं असेल, मनमोकळे बोलायचे असेल,आयुष्यातील कडू गोड आठवणी सांगायच्या असतील
काही खुलासे करायचे असतील
पण त्यांची निघून जाण्याची वेळ झाली हे आमच्या लक्षात आलेच नाही.
तुमच्या आमच्या बाबतीत हे होऊच नये… आजच व्यक्त व्हा यासाठीच हा लेख प्रपंच.
- सिद्धेश्वर राना पवार
गोडवा,बालाजी नगर,मेहकर
9422880080 / 7350473030
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार, दैनिक देशाेन्नतीचे विशेष प्रतिनिधी आणि ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विदर्भ विभाग संपादकीय सल्लागार आहेत.)