आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : स्वानंद सुखनिवासी जोग महाराज अर्थात विष्णुबुवा जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या ‘अमृतमहोत्सवानिमित्त’ राष्ट्रध्वजाला (तिरंगी झेंड्याला) पूज्य मारुती महाराज कुरेकर यांच्या द्वारा मानवंदना पूर्वक अभिवादन करून नरहरी महाराजांच्या संयोजनातून वारकरी शिक्षण संस्था (मूळ) येथून वारकरी संप्रदाय पद्धतीने- टाळ, पखवाज, पताका व अनेक राष्ट्रध्वज घेऊन नगर प्रदक्षिणा वारकरी परंपरेप्रमाणे पूर्ण करण्यात आले. दरम्यान माउली मंदिरात मंदिर प्रदक्षिणा करून भारतीय ध्वज आणि वारकरी सांप्रदायिक दिंडीचा समारोप हरिनाम गजरात देशभक्तीमय वातावरणात राष्ट्रगीत होऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ हा गजर करीत समारोप झाला. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात करण्यात आली.
येथील वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेचे संस्थापक स्वानंद सुखनिवासी जोग महाराज अर्थात विष्णुबुवा जोग यांचा आणि लोकमान्य टिळक यांचा अतिशय जिव्हाळा पूर्वक, अध्यात्मिक आणि देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्या साठीच्या दॄष्टीने ऐतिहासिक असा संबंध होता. किंबहुना अनेकदा जोग महाराज लोकमान्य संतांची वचने सांगून त्यांना धैर्य व उत्साह निर्माण करीत असत, असे अनेक दाखले वर्तमान पत्रातून, अन्य लिखाणातून आपल्या प्रत्ययास ,वाचनास येत असतात ही अनेकांची अनुभूती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेत, पण जे प्राणपणाने लढून आपले सर्वस्वाचे बलिदान करणारे लोकमान्य टिळक यांच्या सानिध्यात जोग महाराज किंवा जोग महाराजांच्या सानिध्यात लोकमान्य हा ‘अन्वय’ आपण कसाही घ्या ; परंतु जोग महाराजांचे योगदान हे स्वातंत्र्यांकरिता लोकमान्यांना खूप आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील अनेक दाखले जोग महाराज टिळकांना देत. ते गमतीने संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत, लोकमान्यांना म्हणत, “पुण्य उभे राहो आता संतांच्या या कारणे । पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल॥ ” महाराज उत्तरार्धातील चरण ‘विलायतीच्या लागा वाटे स्वातंत्र्य भेटी निश्चित॥’ असाही विनोद महाराज लोकमान्यांना करीत असत. हा पूर्ण अभंग महाराज स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लावत असत. देशाला स्वातंत्र्य मिळावे अशी उत्कट व प्रकट भाव महाराजांचा असायचा, म्हणून लोकमान्य यांचे आणि महाराजांचे संबंध शेवट पर्यंत सुव्यवस्थित होते. स्वातंत्र्यापूर्वी महाराजांनी आध्यात्मिक राजधानी मध्ये १९१७ ला वारकरी शिक्षण संस्था स्थापन करून जनमानसात अध्यात्मिक विचारांबरोबर देशनिष्ठाही जागवत असत. याच ‘देश स्वतंत्र’ व्हावा या पूर्वापार संबंधातून व आपले देशाचा नागरिक म्हणून शेवटी वारकरी शिक्षण संस्था (मूळ) येथे येऊन दिंडीचा समारोप ७६ व्या स्वातंत्र्य दिनी करण्यात आला.
देश स्वातंत्र्य अमृत महोत्सवा विषयी अनेकांचे बलिदान या स्वातंत्र्यासाठी झाले असून, त्यासाठी पूज्य मारुती महाराज कुरेकर बाबांनी अनेक राष्ट्रपुरुषांचे दाखले देत अर्धा तास मार्गदर्शन करून लोकमान्य टिळक व जोग महाराज यांचा अनोखा संबंधही यावेळी सांगितला. वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव चंदिले नाना यांनीही स्वातंत्र्य विषयी नंदुरबारचे शिरीष कुमार यांच्या बलिदानाविषयी दाखला देत विद्यार्थी वर्गाच्या भावना जागवल्या. समारोपात नरहरी महाराज चौधरी यांनी राष्ट्रपुरुषांच्या बलिदाना विषयीच्या भावना जागवत त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज देशात सुखी आहोत, तसेच त्यांच्या बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत असे सांगितले. राष्ट्रगीत होऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ हा गजर होऊन समारोप झाला.