पुणे (विशेष प्रतिनिधी) – नाशिक येथील विश्वकर्मा मंदीर ट्रस्ट, सोमवारपेठच्या विश्वस्त मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत बाळकृष्ण दिघे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने विजय मिळवला आहे. हे पॅनल बहुमताने निवडून आले. १४ ऑगस्टरोजी झालेल्या निवडणुकीत ६८१ सभासदांपैकी ३७५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर १३ मते बाद झाली होती. नवनिर्वाचित विश्वस्तांचे अभिनंदन होत आहे.
नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनच्यावतीने या मंदीर ट्रस्टसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यासाठी १४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संघटनेचे अध्यक्ष उत्तम (बाबा) गांगर्डे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मधुकर कांगणे, तर मतदान अधिकारी म्हणून राजेंद्र अहिरे, सतीश जगताप, बी.बी.राठोड, श्री केल्हे या संघटनेच्या पदाधिकार्यांनी काम पाहिले. विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट, नाशिक या १९३० रोजी स्थापन झालेल्या सामाजिक संस्थेची ही पंचवाषिर्क निवडणूक होती. १४ ऑगस्टला झालेल्या मतदानात संस्थेच्या ६८१ पैकी ३७५ सभासदांनी मतदान केले. त्यातील १३ मते बाद झाली.
प्रत्येक सभासदाने नऊ विश्वस्तांना मत देऊन पुढीलप्रमाणे विश्वस्तांची निवड केली आहे. दिघे बाळकृष्ण (३३४ मते), गाडेकर प्रविण (३३१मते), जाधव सीताराम (३३० मते), भालेराव प्रज्ञा (३२९ मते), बोराडे निवृत्ती (३२९ मते), देवकर संदेश (३२९ मते), सूर्यवंशी विलास (३२७ मते), भालेराव राजेंद्र (३१७ मते), जाधव विजय (३११ मते) या प्रमाणे निवडून दिले आहे. नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाचे विविध सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे.