नंदूरबार (आफताब खान) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन नागरिकांमध्ये वनसंरक्षण व वनसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होवून जिल्ह्यातील नागरीकांना निसर्ग अनुभवता यावा, परिसरातील नागरिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण व्हावा या हेतुने नंदुरबार वनविभाग, चिंचपाडा वनक्षेत्रातंर्गत नवापूर तालुक्यातील दापूर येथील ‘गिधकडा धबधबा निसर्ग पाऊलवाट’ येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी श्रीमती खत्री यांच्या हस्ते दापूर संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून उभारलेल्या पॅगोडा, प्रवेशद्वार, नैसर्गिक पाऊलवाट, मचाण, महिला व पुरुषासाठी चेजिंग रुमचे उद्घाटन करण्यात आले. या परिसरात नागरिकांनी पावसाळी पर्यटनासाठी येण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, धुळे वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक दि. वा. पगार, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनव्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच दापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.