– राज्यात १५ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्यात अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १५ लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामधून शेतकर्यांना सावरता यावे यासाठी ‘एनडीआरएफ’च्या मदतीचे निकष न पाहता, शेतकर्यांच्या हिताचा शिवसेना आणि भाजप युती सरकारने विचार केला आहे. त्यानुसारच हेक्टरी जी मदत ६ हजार ८०० होती ती आता १३ हजार ६०० करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी कोल्हापुरात सातत्याने निर्माण होणार्या पूरस्थितीवरही कायमचा तोडगा काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत.
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात पावसाने उसंत घेतली असली तरी, सांगली अन् कोल्हापुरात पावसाचे थैमान सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा परिणाम आता खरीप हंगामावर झाला हे स्पष्ट आहे. नुकसानीची तीव्रता पाहता शेतकर्यांना भरीव मदत मिळावी, अशी मागणी विरोधक आणि शेतकर्यांनीही केली होती. त्यानुसार राज्य सरकारने एनडीआरएफच्या माध्यमातून दिल्या जाणार्या रकमेत दुपटीने वाढ केली तर नुकसानीचे क्षेत्र हे ३ हेक्टरपर्यंत केले आहे. यापूर्वी केवळ २ हेक्टरावरील नुकसानीसाठी ही मदत केली जात होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पावसाने केवळ शेतकर्यांची पिकेच हिरावली असे नाही तर अनेकांचे संसारही उघड्यावर आले आहेत. घरांची पडझड झाली आहे. त्यांच्यासाठीही मदत निधीची तरतूद केली जाणार आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि आता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. वेळप्रसंगी नियमावलीत बदल केला जाईल पण शेतकर्यांना वार्यावर सोडले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.