कुमार नगर भागात हाेती चिनुची दहशत?
धुळे (ब्युरो चीफ) – शहरातील सिंधी कॅम्प परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची मारेकर्यांनी गोळ्या घालून हत्या केली. चंदन उर्फ चिनू पोपली असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, या घटनेने धुळे शहर हादरून गेले आहे.
शहरातील साक्री रोड परिसरातील कुमार नगर भागात चंदन उर्फ चिनू पोपली (वय ३९) याची प्रचंड दहशत होती, अशी माहिती हाती आली असून, कुमार नगर भागात ताे कुटुंबीयांसह राहात होता. दुचाकीवरून आलेल्या २ ते ३ अज्ञातांनी त्याला अगदी जवळून गोळ्या घातल्या. उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी यासीन पठाण आणि भटू चौधरी या दोघांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, अन्य एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत होते.
चिनू पोपली हा काल रात्री घरी नसताना, त्याच्या घरी आलेल्या २ ते ३ जणांनी त्याच्या पत्नीला तो कोठे आहे? याबाबत विचारणा केली होती. मात्र पत्नीने तो घरी नसून बाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर ते दुचाकीवरून निघून गेले. घरी आलेल्या या व्यक्तींबाबत पत्नीने चिनू याला फोनवरून माहिती दिली. काही वेळातच तो घराच्या जवळ पोहोचल्यानंतर त्या आरोपींनी त्याला गाठले व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादातूनच आरोपींनी थेट आपल्याजवळील रिव्हॉल्वर काढून चिनू पोपली याच्यावर गोळीबार केला. प्रचंड जखमी अवस्थेत चिनू घरी आला, आणि त्याने घडलेल्या घटनेबाबत पत्नीला माहिती दिली. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिस सूत्राकडून प्राप्त झालेली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी काही तासांतच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले व रात्रीपासून त्यांच्याकडे चौकशी सुरु होती. तर एक संशयित फरार असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पैशाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे पोलिस सूत्राने सांगितले असले तरी, पोलिस कसून शोध घेत आहेत. शहर पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली, त्यात यासीन शेख पठाण व भटू चौधरी यांचा समावेश असून १ अनोळखी संशयिताचा शोध सुरू असल्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
धुळे शहरात अलिकडे घातक शस्त्रे व अवैध बंदुका यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ही शस्त्रे ताब्यात घेण्याची गरज आहे. तसेच, शहरातील गुंडगिरी मोडित काढण्यासाठी ठोस कारवाईची गरज निर्माण झाली आहे.