लातूर (गणेश मुंडे) : भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात रेणापूर तालुक्यातील रामवाडी (ख) आणि नरवटवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली असून, या निवडणुकीत मनसेचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, रेणा कारखान्याचे संचालक अनिल कुटवाड आदी दिग्गज पुढार्यांच्या पॅनलचा मतदारांनी धुव्वा उडविला. नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा आ. कराड यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. रेणापूर तालुक्यातील रामवाडी (ख) आणि नरवटवाडी ग्रामपंचायतसाठी ४ ऑगस्ट गुरुवार रोजी मतदान झाले या मताची मोजणी ५ ऑगस्ट शुक्रवार रोजी होऊन यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या पॅनलने रामवाडी ख. येथे सातपैकी सात आणि नरवटवाडी येथे सातपैकी पाच जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
रामवाडी (ख) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गोडभरले, भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते महेंद्र गोडभरले यांच्या ग्राम विकास पॅनलचे सर्वच्या सर्व सातही उमेदवार शंभरहून अधिक मताच्या फरकाने विजयी झाले या निवडणुकीत अनिल कुटवाड यांच्या परिवर्तन पॅनलचा मतदारानी धुवा उडवीला. विजयी उमेदवारात पांडुरंग कलूरे, शाहूताई नराळे, रोहिणी सुरवसे, सुवर्णा दिवटे, रोहिणी गोडभरले, शिवकर्ण सुरवसे यांचा समावेश आहे.नरवटवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर आणि माजी सभापती सौ. अयोध्या आंबेकर यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलने मनसेचे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला.
अटीतटीच्या झालेल्या या लढतीत ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे ज्ञानदेव आंबेकर, सुकेश शिंदे, सत्यभामा आघाव, रोहिणी आघाव आणि कविता आंबेकर यांनी विजयाची बाजी मारली. रामवाडी आणि नरवटवाडी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. मिळालेल्या संधीच विकास कामातून सोनं करावे, दोन्ही गावाच्या विकास कामासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही असे सांगून आजपासूनच जिल्हा परिषद निवडणूकीसाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपाचे सरचिटणीस विक्रम शिंदे, तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, वसंत करमुडे, महेंद्र गोडभरले, सुरेंद्र गोडभरले, माऊली नराळे, श्रीकृष्ण पवार, शालिक गोडभरले, दत्ता अंबेकर, सदाशिव राठोड, गोविंद चिताडे, रमेश गोडभरले, हणमंत कुटवाड, रघुवीर गोडभरले, विनोद अंबेकर, ज्ञानेश्वर गोडभरले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.