लातूर (गणेश मुंडे) : तालुक्यातील पोहरेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी, पिठाची गिरणी व मिरची कांडप सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग आधार प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती दीपमाला तुपकर यांच्या हस्ते या योजनांचा शुभारंभ करण्यात आला.
पोहरेगावचे लोकनियुक्त सरपंच गंगासिंह कदम यांनी गावातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या अंतर्गत गावकऱ्यांना दररोज २०लिटर शुद्ध पाणी दिले जाणार आहे. पिठाच्या गिरणीतून दळण व मिरची कांडप यंत्राच्या माध्यमातून तिखट मोफत कुटून दिले जाणार आहे. श्रीमती तुपकर यांच्या हस्ते फीत कापून या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी काकासाहेब शिंदे,रामराव बेगडे,उत्तम शिंदे, अंबादास गायकवाड, विश्वजीत साळुंखे, विलास गायकवाड या दिव्यांग बांधवांच्या हस्तेही श्रीफळ फोडण्यात आले.
लाभार्थ्यांना या योजनेचे कार्डही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पंढरी चेपट, ग्रामविकास अधिकारी डी.आर. कांगणे, चंद्रकांत साळुंखे, सुंदर कणसे, सतीश मोरे, शंकर राठोड, लालासाहेब मोरे, चंद्रकांत राठोड, संजय चव्हाण, अनिल सरवदे, संदीप वाघ, गणपत केसरे, किशनराव यादव, ज्ञानेश्वर मोरे, दगडू लोखंडे, माणिक लोखंडे, सुभाष मडके, महादेव गायकवाड, जगन्नाथ मोरे, पिंटू केसरे, शाम गायकवाड, विलास गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.