चिखली, जि. बुलडाणा (एकनाथ माळेकर) – प्रसिद्ध अभिनेता अमीर खान याच्या वॉटर फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार पटकविणार्या मोताळा तालुक्यातील सिंदखेडा गावाची पाहणी करण्यासाठी विकास अवनेश फाउंडेशनचे पदाधिकारी व संशोधक आलेले आहेत. ते या गावाच्या जलसंधारण मॉडेलचा अभ्यास करत असून, त्यांच्या संशोधनासाठी गावाची निवड झाल्याने गावकरी आनंद व्यक्त करत आहेत.
प्रसिद्ध अभिनेता अमीर खान याच्या वाटर फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभागी होऊन मोताळा तालुक्यातील अनेक गावांनी आपल्या गावाचा पाणलोट विकास केला आहे. प्रशिक्षण, श्रमदान व गावाची ऐकी या त्रिसूत्रीचा अवलंब करीत, या गावांनी स्वतःला पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर केले आहे. याचा या गावांना मोठा फायदा झाला आहे. खरीप पिकाच्या संरक्षित सिंचनाबरोबरच रब्बी पिकाचा पेराही या गावात वाढला आहे. सिंदखेड गावाने वॉटर कप मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे. या गावाच्या अभ्यास करण्यासाठी विकास अवनेश फाऊंडेशन या संस्थेचे अधिकारी तीन दिवशीय मोताळा तालुक्याच्या दौर्यावर आलेले आहेत. यामध्ये डॉ. शिवा मुथ्थुप्रकाश,तामिळनाडू, मोहन बरंगे मुळशी, श्रीमती समीरा आंध्रप्रदेश यांचा समावेश आहे. या दरम्यान त्यांनी सिंदखेड येथे भेट देत येथे झालेल्या जलसंधारण कामाची पाहणी करीत कौतुक केले. १० हेक्टरही रब्बी पीक न येणार्या सिदखेड मध्ये आज २०० हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आलेली आहे. विहीर पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली अधिकार्यांना बघायला मिळाली. सिंदखेड गावाचे जलसंधारण मॉडेल या अभ्यासातून देशातील इतर गावानाही मार्गदर्शक ठरणार आहे. सिंदखेड प्रमाणेच चिंचखेड आणि उर्हा या गावांनादेखील ही टीम भेट देणार आहे.
VikasAnvesh Foundation (VAF) हा टाटा ट्रस्टचा एक उपक्रम आहे. विविध समुदाय आणि तळागाळातील कामगारांना भेडसावणार्या मुख्य विकास समस्यांवर लक्ष केंद्रित करून, त्यांच्यावर उच्च दर्जाचे आणि उच्च-तीव्रतेचे संशोधन करून आणि धोरणविषयक चर्चांमध्ये निष्कर्ष गांभीर्याने घेतले जातील, याची खात्री करून, एक अद्वितीय केंद्र बनण्याचे VAF चे उद्दिष्ट आहे. जलसंधारण वर जास्तीचा अभ्यास आणि प्रसार ध्येय आहे. VAF अशा समस्यांची ओळख, व्यक्तिचित्रण आणि प्रगती यासाठी भारतभरातील भागीदारांच्या श्रेणीसोबत काम करते.
सिंदखेड ग्रामस्थांनी केलेली जलसंधारण कामे- सीसीटी, डीप सीसीटी, माती नाला बांध, विहीर पुनर्भरण, वृक्षारोपण, देशी गवत लागवड, एलबीस, मियावाकी सुरवात, ग्याबीयन बंधारा, शोषखड्डे ही जलसंधारणाची कामे या गावाने केली आहेत, अशी माहिती संदीप भास्कर माळेकर (सिंदखेड मातला तालुका मोताळा) यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे.
एकी आणि नेकीच्या बळावर गावाने जलसंधारण आणि इतर कामे केली असून विविध पुरस्कार देखील घेतलेले आहे. आता पुढील कामे बक्षीस निधी आणि सीएसआर निधीतून करू. गावाचे नाव राज्यबाहेर देखील जात आहे. त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा आहे, नवीन ऊर्जा मिळेल.
– आप्पा कदम, सरपंच सिंदखेड
—————–