कर्जत (प्रतिनिधी) : शहरातील कुंभारगल्लीतील पश्चिम पूर्व व उत्तर दक्षिण असा रस्ता अतिक्रमण काढून खुला करावा, सिटीसर्व्हे मार्फत रस्ता न मोजता सुरू असलेली रस्ता करण्याची कार्यवाही थांबवावी, या रस्त्यावरील सर्वच अतिक्रमणे काढलेशिवाय रस्त्याचे काम करण्यास हरकत घेत, येथील क्षीरसागर कुटुंबियांनी मंगळवार दि.०२ ऑगस्ट सकाळी ११ वाजेपासून नगरपंचायत कर्जत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यामध्ये आशा बाळासाहेब क्षीरसागर यांचेसह अमोल बाळासाहेब क्षीरसागर, अजिंक्य बाळासाहेब क्षीरसागर, हर्षदा अमोल क्षीरसागर, ऋतुजा अजिंक्य क्षीरसागर आदी सहभागी झाले आहेत.
याबाबत माहिती देताना अमोल क्षीरसागर म्हणाले की, गेली अनेक वर्षांपासून हा रस्ता मंजूर आहे. मात्र त्याची मोजणी करून रस्ता करणे आवश्यक असताना, नगरपंचायतने केलेल्या पंचनाम्यात खोट्या सह्या घेऊन आमच्या कुटुंबीयांचा जबाब न घेता कार्यवाही केली आहे. या रस्त्यावर आमच्या चार ठिकाणी जागा असताना आम्हाला मात्र याबाबत माहिती देण्यात आली नाही. या बाबत अनेक तक्रारी अर्ज करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात असून नगर पंचायतचे मुख्याधिकारी सूडबुद्धीने व राजकीय दबावाखाली फक्त आमच्यावर कारवाई करत आहेत. रस्ता करण्याला आमचा विरोध नाही मात्र सिटी सर्व्हेच्या नकाशाप्रमाणे नियमात मोजणी करण्याऐवजी मनमानी पद्धतीने रस्ता करण्याची प्रशासन घाई करत असून, बळाचा वापर करून आमच्यावर अन्याय केला जात आहे, असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांशी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही, या बाबत जाधव यांनी म्हटले की, कुंभार गल्लीतील रहिवासी यांची रस्ता करण्याची मागणी आहे. आगामी काळात गणेशोत्सव महालक्ष्मी या सणासाठी येथे वर्दळ राहणार आहे मात्र हे कुटुंब जाणून बुजून विरोध करत आहेत. नियमानुसार रस्त्याचे काम केले जाणार असून मोजणीनंतर इतर अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले आहे.