– करंजी घाटात दरड कोसळली; पावसानेही झोडपले, घरांत पाणी शिरले; शेवगाव, पाथर्डी, बीड तालुक्यांत नदी-नाल्यांना पूर; कडा येथे अडकलेल्या लोकांची लष्करी हेलिकॉप्टरने सुटका
– पावसामुळे जामखेड तालुक्यातील सारोळा बद्धी येथील पूल वाहून गेला; अहिल्यानगर जिल्ह्यात आज व उद्या शाळांना सुट्टी जाहीर!
अहिल्यानगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत तालुक्यांसह बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी या तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. नद्यांना पूर आले असून, अनेक गावांत पाणी शिरले होते. कडा येथे पूरस्थिती गंभीर बनल्याने लष्काराला पाचारण करण्यात आले. पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून, शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस कोसळत होता. करंजी गावातील अमराई नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आला, तर जामखेड रोडवर सारोळा बद्धी येथे पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर असल्याने व अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकार्यांनी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी शाळा व्यवस्थापनाला आहेत. या पावसाने तूर, बाजरी, सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला पिके अक्षरश: पाण्याखाली गेली आहेत. पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी या गावांना ढगफुटीसदृश पावसाचा मोठा फटका बसला. पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः करंजी आणि जवखेडे येथे सुमारे 70 ते 80 लोक पुरात अडकले होते, ज्यांना स्थानिक आणि आपत्ती निवारण पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. ढोरजळगाव येथील ढोर नदीलाही महापूर आला असून, पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत खामकर यांनी कळविली आहे.
अहिल्यानगर शहरात आज (दि. १५) पहाटे पासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून, पावसामुळे नगर अर्बन बँकेसमोरील जुना धोकादायक वाडा कोसळला आहे. तसेच, पाथर्डी तालुक्यातील कल्याण-विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर करंजी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अहिल्यानगर ते जामखेड रस्त्यावर सारोळा बद्दी (ता. नगर) येथील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पाथर्डी तालुक्यात ढगफुटी झाली असून, पाण्याचा ओघ वाढल्याने छोटे तलाव फुटले आहेत. त्याचा अनेक गावांना फटका बसला आहे. शेजारच्या बीड जिल्ह्यातदेखील पूरस्थिती गंभीर बनली आहे. कडा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरले असून, ग्रामस्थ जीव वाचविण्यासाठी इमारतींच्या छतावर चढले होते. या ग्रामस्थांच्या बचावासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक शेतकर्यांची जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केज, अंबाजोगाई तालुक्यांसह संपूर्ण बीड जिल्ह्यात सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे भरून वाहू लागली आहेत. अनेक नद्यांना पूर आला असून, गावोगाव नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही गावांचा संपर्क तुटला असून, अनेक ठिकाणी पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या परिस्थितीत स्थानिक व जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात असून, प्रशासन अॅलर्ट मोडवर कार्यरत आहे.

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी या गावांना ढगफुटीसदृश पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः करंजी आणि जवखेडे येथे सुमारे ७० ते ८० लोक पुरात अडकले होते, ज्यांना स्थानिक आणि आपत्ती निवारण पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. करंजी गावातील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला आहे. या भागातील ग्रामस्थांनी अनेक वर्षांनंतर असा पूर पाहिल्याचे सांगितले. अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी येथील पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचबरोबर, कडा येथेही पूर आल्यामुळे नगर ते जामखेड वाहतूक थांबली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात ४० गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून काढावे लागेल, असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकार्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिक वरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशीदेखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला.
पाथर्डी तालुक्यात डोंगरपट्यात सोमवारी मध्यरात्री ढगफुटी झाल्यामुळे सर्वत्र नदी नाल्याने पाणीच पाणी होऊन तालुक्यातील ढोरा, नंदिनी नदीला महापूर आल्याने वाहतूक ठप्प झाली. १८ ते २० गावांना फटका बसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सतर्क राहून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पाथर्डी, अहिल्यानगरला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती. सोमवारी रात्री तीनच्या सुमारास पावसाने सर्वत्र अचानक जोर धरला. अनेक भागात ढगफुटी व मुसळधार पाऊस कोसळल्याने रस्ते वाहून गेले. नदी, नाल्यांना पूर आला आहे. पाथर्डी तालुक्यातील डोंगर माथ्यावरील नद्यांचे पाणी शेवगाव तालुक्यातून जायकवाडीला मिळते. या अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यातील नंदिनी नदीला पूर आल्याने आखेगाव, वरुर, भगूर, वडुले बुद्रुक, शेवगाव (लांडेवाडी), जोहरापूर तसेच पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगाव भागातील पाणी ढोरा नदीला आल्याने वडुले खुर्द, वाघोली, ढोरजळगाव – शे, ढोरजळगाव – ने, सामनगाव, माळेगांव शे, लोळेगाव, अखतवाडे, या नदी काठावरील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अनेक गावात शेतात पाणी गेल्याने खरीप हंगामातील पिकाचे नुकसान झाले आहे. नदी काठच्या काही भागात घरांमध्ये पाणी पार शिरले आहे. प्रशासन सतर्क असून, संभाव्य धोका लक्षात घेता, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, गटविकास अधिकारी सोनल शहा, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी अनेक गावाना भेटी देऊन सूचना दिल्या. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे, तसेच मागील पूरपरिस्थितीचा अनुभव लक्षात घेता संभाव्य पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन नदी काठावरील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पाथर्डी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नंदिनी नदीला पूर आला असून, भगूर येथील पुलावर पाणी आल्याने शेवगाव- पाथर्डी-अहिल्यानगरला जाणारा राज्यमार्ग सायंकाळी सहाच्या सुमारास बंद केला गेला. शेवगावला जोडणारे पैठण, पाथर्डी, मिरी मार्ग अहिल्यानगर, हे मार्ग पुरामुळे बंद पडले आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे घराचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच जायकवाडी जलाशय भरल्याने गोदावरी काठावरील मुंगी गावाला सतर्क राहण्याचे प्रशासनाने आदेश दिले असल्याची माहिती आहे.
आमदार मोनिकाताई राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेवगाव, पाथर्डी तालुक्यात पूरग्रस्त भागातील शेतकर्यांना व नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी पत्राद्वारे मागणी केली असून, प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.