-‘लोकसंवाद-२०२६’ अभियान; १६ ते २४ सप्टेंबरदरम्यान राज्यभर आयोजन
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे ‘लोकसंवाद-२०२६’ हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभरातील प्रमुख गणेश मंडळांच्या ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळांचा जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून वापर करण्यात येणार आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्यासोबतच नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
विविध योजनांची मिळणार माहिती
‘लोकसंवाद-२०२६’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण यांसह विविध शासकीय विभागांचा सहभाग राहणार आहे. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट, महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या योजना, युवक व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि शिष्यवृत्ती योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी व उपचारांशी संबंधित सुविधांची माहितीही देण्यात येणार आहे. युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.
अधिकारी नागरिकांशी साधणार थेट संवाद
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय, पोलीस विभाग यांसह संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येणार आहे. स्थानिक क्षेत्रीय अधिकारी, जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ गणेश मंडळांच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. त्यामुळे शासनाच्या योजनांची अधिकृत आणि प्रत्यक्ष माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
सोशल मीडियावरही जनजागृती
शक्य त्या ठिकाणी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमांचे फेसबुक व यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंतही योजनांची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गणेश मंडळांना सहभागाचे आवाहन
‘लोकसंवाद-२०२६’मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. मुंबई शहर व उपनगरातील गणेश मंडळांनी माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाने केले आहे.