अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ७५ हजार; फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत द्या!
– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांचा दौरा केला; पण नुकसानीबाबत केंद्राला कळवलेच नाही!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते व विधीमंडळ सदस्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (२ ऑगस्ट रोजी) राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले. अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदितीताई तटकरे, आमदार सर्वश्री अनिल पाटील, नितीन पवार, चंद्रकांत नवघरे, सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ७५ हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.
दरम्यान, पत्रकार परिषद घेऊनही हीच मागणी अजित पवार यांनी केली होती. शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र देणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. उद्या कॅबिनेटची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे असा खोचक टोलाही पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावल होता. यावेळी अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे असे सांगतानाच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्रसरकारला अद्याप कळवले नाही असे दिसते, त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करायला आलेली नाही असेही अजित पवार म्हणाले. विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. त्यामुळे कृषी विभागाने व सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाही. या शेतकर्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे ४ लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी आहे त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे तिकडे लक्ष दिला पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने होत नाही असा चिमटाही अजित पवार यांनी काढला होता.
मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्यांचे अधिकार एकवटले, उपमुख्यमंत्र्यांना खातेच दिले नाही!
मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्री यांना खातेच दिलेले नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत. मात्र सहीअभावी फाईली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्री यांना अधिकारच दिलेला नाही. राज्यसरकारचे अधिकार गतीने व्हायला हवे व जनतेची कामे झाली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे असेही अजित पवार म्हणाले. कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकर्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला. मुख्यमंत्री मिरवणूका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. दहानंतर सभा घेत नाही तो एक नियम आहे हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत तर पोलीस अधीक्षक काय करणार. अक्षरशः घटना पायदळी तुडवत असतील तर काय करणार असा उद्विग्न सवालही अजित पवार यांनी केला.
——————