-आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आदित्यच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली; बारामती येथील शिक्षण संस्थेत राहण्याचीही व्यवस्था करणार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील स्व. सुधीर माणिकलाल काकरवाल यांचे ३ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे त्यांनी दत्तक घेतलेला आदित्य काकरवाल हा मुलगा पोरका झाला. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आदित्यच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार पुढे सरसावले असून, त्यांनी आदित्यला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दत्तक घेऊन न थांबता त्याच्या शिक्षणाची, संगोपनाची तसेच नोकरी मिळेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या निर्णयामुळे माणुसकी जपणारा नेता म्हणून त्यांची ख्याती पुन्हा अधोरेखित झाली आहे.
साखरखेर्डा येथील सुधीर माणिकलाल काकरवाल आणि रत्ना सुधीर काकरवाल हे वार्ड क्रमांक सहामध्ये राहत होते. त्यांना अपत्य होत नसल्याने या दाम्पत्याने दहा वर्षांपूर्वी अनाथाश्रमातून एका मुलाला दत्तक घेतले होते. त्याचे नामकरण आदित्य असे करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच म्हणजे १३ जून २०१७ रोजी रत्ना सुधीर काकरवाल यांचे पोटाच्या आजाराने निधन झाले. आदित्य अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याच्या आईचे छत्र हरपले. त्यानंतर आजी आणि सुधीर यांनी त्याचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला.
आदित्य १३ वर्षांचा असताना, एक महिन्यापूर्वी त्याच्या आजोबांचे निधन झाले. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी वडील सुधीर काकरवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे घरात आजी आणि आदित्य हे दोघेच उरले. ४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार रोहित पवार साखरखेर्डा येथे आले असता, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी त्यांना आदित्यची परिस्थिती सांगितली. ही बाब समजताच आमदार रोहित पवार यांनी तत्काळ आदित्य काकरवालला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. बारामती येथील शिक्षण संस्थेत त्याच्या राहण्याची आणि संपूर्ण शिक्षणाची व्यवस्था करण्यासह नोकरी मिळेपर्यंत त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आदित्यला आमदार रोहित पवार यांच्या निर्णयामुळे पुन्हा आधार मिळाला आहे. रामभाऊ जाधव यांनी आदित्यबद्दल दाखवलेली तळमळ यानिमित्ताने कामी आली. आई-वडिलांपासून पोरका झालेल्या आदित्यला या निर्णयामुळे नव्याने जगण्याची उमेद मिळाली असून, त्याच्या भविष्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. आमदार रोहित पवार यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल साखरखेर्डा येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. येत्या काही दिवसांत रामभाऊ जाधव आणि सरपंचपती अमित जाधव हे आदित्य काकरवालला घेऊन बारामती येथे जाणार असून, त्याच्या पुढील व्यवस्थेबाबत कार्यवाही करणार असल्याचे रामभाऊ जाधव यांनी सांगितले.