-रुग्णांची हेळसांड; उपचाराअभावी नागरिक त्रस्त, आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
चिखली (अंकुश पाटील) : शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी डॉक्टर उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची तक्रार समोर येत आहे. रात्री अचानक उद्भवणाऱ्या आजारांवर तसेच अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार मिळणे अपेक्षित असताना, डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्यसेवेचे महत्त्वाचे आधारस्थान आहे. मात्र, रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्यास गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा खर्च होण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः रात्रीच्या वेळी लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला तसेच अचानक प्रकृती बिघडलेल्या रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या अडचणी वाढतात. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज
शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी डॉक्टरांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
रात्रीची आरोग्य सेवा सक्षम करण्याची मागणी
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे शेळगाव आटोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रात्रीची आरोग्य सेवा सुरळीत करावी, डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रुग्णांना दिलासा देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.