नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी : बंडखोर शिवसेना नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवा, हे सरकार असंवैधानिक आहे, असा आक्षेप घेणार्या विविध चार याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. यासह शिंदे गटाच्या याचिकांवर उद्या, बुधवारी (दि.३) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने, शिंदे सरकारचा फैसला उद्याच लागणार आहे. तसेच, देशातील लोकशाही व्यवस्था कायम ठेवणे व न्यायसंस्थेवरील लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी सर्वोच्च न्यायपीठ काय संवैधानिक भूमिका घेते, याकडे महाराष्ट्रासह देशाचेदेखील लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आले आहे. तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेला आहे. ठाकरे गटाकडून शिंदेंविरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकेवर गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तिवाद झाला होता. न्यायपीठाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवरती गेली. आता उद्या शिंदे सरकारचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय भवितव्याचाही फैसला ठरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील लढाई ही आम्ही जिंकणार आहे. आता आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आमचे सरकार हे पूर्णपणे कायदेशीर मार्गाने स्थापन झालेले आहे, आणि शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच आहे. असा दावा हा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. मात्र दुसर्या वेळेला आम्हाला कोर्टात न्याय मिळेल आणि शिंदे गटाला मोठा दणका बसेल, हे सरकार बेकायदेशीर आहे, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा आणि कायदेशीर बेकायदेशीर कोण? हे उद्या सर्वोच्च न्यायालय स्पष्ट करू शकते.
या आहेत त्या चार याचिका
१) एकूण १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान
२) राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान
३) शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप
४) एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप
…. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील!
16 बंडखाेर आमदार अपात्र ठरले तर उर्वरित आमदार हे भाजपमध्ये जातील व देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, अशी शक्यता एका वरिष्ठ राजकीय नेत्याने नाव गाेपनीय ठेवण्याच्या अटीवर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली आहे. कारण, शिवसेनेने ज्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यास सांगितले आहे, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आहेत. त्यामुळे शिंदे अपात्र ठरले तर उर्वरित आमदारांना भाजपशिवाय पर्याय राहणार नाही. मध्यावधी निवडणुका नकोत, म्हणून भाजप सत्ता स्थापनेचा दावा दाखल करू शकतो, असेही हे नेते म्हणाले. आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते, असे जाणकार सांगत आहेत. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्याचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले. उद्याचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. तर निकालानंतर शिवसेनेचे अस्तित्वावरील प्रश्नावरही उत्तरे मिळणार आहेत.