नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य” पॉवर 2047 या ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उर्जा विभागाच्या विविध योजनांच्या देशभरातील निवडक लाभार्थ्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पाहण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात करण्यात आली होती. यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषद सदस्या डॉ. सुप्रिया गावीत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल बोरसे, पी.एफ.सी. नंदुरबारचे नोडल अधिकारी सुमित बंसल, उपकार्यकारी अभियंता विकास खाचणे, उर्जा विभागाच्या योजनांचे लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी व नागरिकांसाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना ), मुख्यमंत्री सौर कृषी योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, कृषी पंप विज धोरण 2020, स्व.विलासराव देशमुख अभय योजना, अशा विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून या योजनांविषयी लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. खासदार डॉ. हिना गावीत यांनी या कार्यक्रमानंतर ऊर्जाविभागाच्या या सर्व योजनांचा थोडक्यात आढावा घेऊन जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.