– कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी विशेष (पीएमएलए) न्यायालयाचा निर्णय
– ‘ईडी’ने मागितली होती ८ दिवसांची कोठडी
– हे सूडाचे राजकारण सुरू आहे, पण लक्षात ठेवा दिवस फिरतात; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा
– शिवसेनेचे राज्यभर तीव्र आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरली
– उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट
राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद संसदेत उमटले. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली हाेती. तर, दुसरीकडे काँग्रेसने राऊत यांना पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस खासदारांनी तर राऊत यांच्या अटकेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ही अटक बेकायदेशीर आहे. राऊत झुकत नसल्यामुळेच त्यांची अटक करण्यात आली आहे. ही हुकूमशाही आहे, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल चढवला. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी राऊत यांची अटक आणि महागाईच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे संसदेचं कामकाज काही काळा करता स्थगित करण्यात आलं. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत संजय राऊत यांच्या अटकेवर चर्चे करण्याची मागणी केली. तसेच खासदारांनी ज्या नोटिसा दिल्या आहेत. त्यावरही चर्चा करावी, अशी मागणी खरगे यांनी केली.
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेना नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना तब्बल १८ तासांच्या चौकशीनंतर काल, मध्यरात्रीच्या सुमारास अमलबजावणी संचलनालयाने (ईडी) कायदेशीररित्या अटक केली. त्यांच्या घरी सापडलेली ११ लाखाची रोख रक्कम ही शिवसेना पक्षाची असून, ती अयोध्या दौर्यासाठी गोळा केली गेली होती, अशी माहिती आ. सुनील राऊत यांनी दिली आहे. दुसरीकडे, केंद्राच्या या दडपशाहीविरोधात राज्यभर शिवसैनिक तीव्र आंदोलन करत आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन चालवले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच, त्यांना धीर दिला.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता, राऊत व ईडीच्या वकिलांनी घमासान युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून राऊन यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. ईडीच्या अधिकार्यांनी आठ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसते आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. राऊत यांची अटक ही राजकीय प्रभावातून झाली असून, ते हृदयाशी संबंधित विविध आजारांचे रूग्ण आहेत, तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली आहे, अशी बाजू राऊत यांच्या वकिलांनी मांडली होती. त्यावर, राऊतांना घरचे जेवण आणि औषधी देणे, राऊतांना हृदयाचा त्रास असल्याने रात्री उशिरापर्यंत चौकशी केली जाणार नाही, तसेच सकाळी एक तास वकिलांशी चर्चा करु शकतात, अशी अनुमती न्यायालयाने दिली आहे. त्यापूर्वी राऊत यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरणी सुमारे १८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने रविवारी मध्यरात्री त्यांना अटक केली होती. रविवारी सकाळी ७ वाजेपासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत त्यांची घरी आणि ईडी कार्यालयात चौकशी झाली.
राऊत यांच्या खोलीतील कागदपत्रे आणि दस्तावेज ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी तपासले. यावेळी साडेअकरा लाख रुपये ‘ईडी’ने जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आपल्याला ‘ईडी’ कार्यालयात यावे लागेल, असे ‘ईडी’कडून राऊत यांना सांगण्यात आले. साडेनऊ तासांच्या ‘ईडी’च्या कारवाईनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास राऊत यांना घेऊन ‘ईडी’ अधिकारी बेलार्ड पिअर येथील कार्यालयाकडे निघाले. निवासस्थानाबाहेर निघताना राऊत यांनी गाडीतून हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. साडेपाचच्या सुमारास राऊत ‘ईडी’च्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी राऊत यांचे भाऊ सुनील राऊत आणि वकील ‘ईडी’ कार्यालयाबाहेर उभे होते. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी चालली होती. याच चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष खिळखिळा झाला असताना आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस खासदार संजय राऊत यांच्यासाठी मैदानात उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेकडून संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ईडीने ही शक्यता लक्षात घेऊनच कालपासूनच कार्यालयाच्या परिसरात बॅरिकेडस लावून नाकांबदी केली होती. तसेच याठिकाणी सीआरपीएफच्या जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. स्वतः शरद पवार मात्र या प्रकरणावर भाष्य न करता, तातडीने दिल्लीला निघून गेले हाेते. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊंताची 8 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने विशेष न्यायालयास केली हाेती. मात्र न्यायालयाने केवळ तीन दिवसांची कोठडी मंजूर केली. तसेच राऊत यांना त्यांच्या वकिलांशी बोलण्याची सुविधा दिली जाईल, असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. ईडीला राऊतची औषधे इत्यादींची काळजी घ्यावी लागेल आणि चौकशीचे तासही निश्चित करावे लागतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणीदरम्यान संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले की, संजय राऊत यांची अटक हा राजकीय कटाचा भाग आहे. राऊत यांना हृदयाशी संबंधित समस्या असून, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. न्यायालयात संबंधित कागदपत्रेही दाखविण्यात आली होती. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचे आढळून येत आहे, असे मत न्यायाधीशांनी मांडले. वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीकडून तर वकील अशोक मृंदरगी यांनी संजय राऊत यांच्याकडून बाजू मांडली.
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपवर घणाघाती टीकास्त्र डागले. ते म्हणाले, ‘प्रादेशिक पक्ष संपवण्याचे भाजपचे कारस्थान आहे. ते काम हे कोश्यारी यांच्या उद्गगारातून झालेली आहे. मी राज्यपाल मुद्दाम म्हणणार नाही. आज जे नड्डांच्या विधानामुळे स्पष्ट झाले आहे. हिंदुत्वामध्ये फूट पाडायची. भाषिक लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा. ज्यामुळे मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण करायचा आहे. मराठी माणसांना चिरडून टाकण्याचे काम आहे. भाजपचे हे काम अत्यंत भेसरूपणे सुरू आहे’, असेही ठाकरे म्हणाले. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा ज्या पद्धतीने पक्ष वाढवत आहे, राजकारणात बुद्धीबळाचा वापर करावा लागतो. पण नड्डा ज्या प्रकारे पक्ष वाढवत आहे, त्यात नुसते बळ वापरत आहे, बुद्धीचा वापर करत नाही. आज तुमच्याकडे आहे, आज तुम्ही सर्वांना संपवण्याचा विचार करत असाल तर सर्वांचे दिवस हे सारखे नसतात. दिवस फिरल्यावर तुमचं काय होणार याचा विचार केला पाहिजे, असा इशाराही ठाकरेंनी दिला.
मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या डोक्यात हवा गेली नाही, त्यामुळे जे मुख्यमंत्री झाले आहे, त्यांनी डोक्यात हवा जाऊ देऊ नये, निर्घृणपणे वागू नका, दिवस आणि काळ सगळ्यांसाठी दिवस हे सारखेच असतात असं नाही. जेव्हा काळ बदलतो तेव्हा तो काळ तुमच्याशी दृष्टपणाने वागेल, ही वेळ येऊ देऊ नका. एकदा सत्तेचा फेस निघाला की यांना कळेल, असा सल्लावजा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
Mumbai | Earlier visuals from the residence of Shiv Sena leader Sanjay Raut, when he was taken to the ED office after being detained by the officials, yesterday (31.07) pic.twitter.com/5dQVqBMJ0s
— ANI (@ANI) August 1, 2022
संजय राऊत यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. आज उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते.