– रायपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याची ग्रामस्थांची तयारी
मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप माेरे) – चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथे अवैधधंद्यांना महापूर आल्याने, गावात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध दारूविक्री केली जात आहे. अंत्री कोळी हे गाव रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असून, प्रभारी ठाणेदार यांनी अवैध धंदे बंद करण्याऐवजी उलट त्यांना छुपा आशीर्वाद दिला आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे गावातील दारू ही तात्काळ बंद झाली पाहिजे, यासाठी शेकडो महिला व पुरुष गावात फिरुन रायपूर पोलिस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढू, असे गावातील महिलांनी म्हटले आहे. तसेच, अवैध धंद्यांविरोधात हे गाव एकवटले असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठीदेखील शिष्टमंडळ लवकरच जाण्याची शक्यता आहे.
चिखली तालुक्यातील रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले हे प्रशिक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून बाहेर गेले आहेत, आणि त्यांच्या ठिकाणी प्रभारी ठाणेदार यांच्याकडे पदभार सोपाविला गेलेला आहे. या प्रभारींनी पदभार घेताच, गावात बंद असलेल्या अवैध धंद्याना पुन्हा उधाण आले आहे. असे अवैध धंद्यांना जर प्रशासन तात्काळ बंद करणार नाही, तर येणारी पिढी व्यसनाधीन होण्याचे संकेत नाकारता येणार नाही. तसेच गोरगरीब महिलांचे संसार उघड्यावर येण्यास वेळ लागणार नाही, असा महिलांनी अंदाज बांधला आहे. गावातील अवैध धंदे हे जर बंद होणार नसतील तर पोलिस प्रशासन आर्थिक देवाणघेवाण करून दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतात काय? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे. दारूमुळे गावात शांतता भंग होत चालली असल्याने गावात वाद तंटे होण्याचे संकेत नाकारता येणार नाही. तरी याकडे पोलीसांनी तात्कांळ लक्ष घालून दारू बंद करावी, अशी मागणी संपूर्ण गावातील नागरिकांकडून होत आहे. तरी संबंधित प्रभारी ठाणेदारांनी तातडीने अवैध धंदे, दारूविक्री बंद करावी, अन्यथा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याची तयारी ग्रामस्थांनी चालवलेली असून, एक शिष्टमंडळ याप्रश्नी जिल्हा पोलिस अधीक्षकांचीही भेट घेण्याची तयारी करत आहे.