Breaking newsKhandeshKokanMaharashtraMarathwadaMetro CityMumbaiNagpurNandurbarPachhim MaharashtraVidharbha

परभणी जिल्ह्याचा कारभार महिला अधिकाऱ्यांच्या हाती

परभणी(जिल्हा प्रतिनिधी):- ‘जिच्या हाथी पाळण्याची दोरी ती जग उद्धारी’ महिलांच्या सन्मानार्थ वापरली जाणारी ही म्हण अतिशय सार्थ आहे. याच म्हणीप्रमाणे आज असंख्य महिला विविध क्षेत्रात प्रमुख पदावर विराजमान झाल्यात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने उमटवत आहेत. परभणीत जिल्ह्यात देखील असंच चित्र आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय पदांवर महिला विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या प्रशासनाची दोरी महिला अधिकाऱ्यांच्या हाती आल्याने आता तरी जिल्हा विकासाच्या वाटेवर येईल अशी अपेक्षा परभणीकर करू लागले आहेत. 

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल या आहेत. तसेच नुकतीच जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रागसुधा आर यांची नियुक्ती झालीय. तत्पूर्वी परभणी महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर या विराजमान होऊन 2 महिन्याचा काळ लोटलाय तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टांकसाळे यांची बदली झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार हा रश्मी खांडेकर यांच्याकडे देण्यात आलाय.

यामुळे जिल्हा प्रशासन असो कि , शहर प्रशासन अथवा ग्रामीण प्रशासन सर्वत्र महिला अधिकाऱ्यांचाच बोलबाला आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यात पालममध्ये प्रतिभा गोरे, पूर्णामध्ये पल्लवी टेमकर, पाथरीमध्ये सुमन मोरे, जिल्हाधिकारी कार्यालयात छाया पवार या 4 तहसीलदार कार्यरत आहेत तर स्वाती दाभाडे, मंजुषा मुथा, अरुणा संगेवार या 3 उपजिल्हाधिकारी कार्यरत आहेत. एवढेच नाही तर जिल्ह्यातील 7 नगर परिषदांपैकी अनेक नगर परिषदांमध्ये देखील मुख्याधिकारी म्हणून महिलाच आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश देखील महिलाच असून त्यांचे नाव यू एम नंदेश्वर आहे.

 

परभणी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रशासकीय पदांवर एकाच वेळी महिला अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासन, जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था, ग्रामीण लोकांशी नाळ असलेले जिल्हा परिषद प्रशासन असो कि जिल्ह्याच्या ठिकाणचे प्रमुख शहर असलेल्या महानगरपालिकेचा गाडा देखील महिला अधिकाऱ्याच्या हाती असल्याने एकमेकींच्या समन्वयातून जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्यास मदतच होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

संवेदनशीलतेने काम होईल-जिल्हाधिकारी आंचल गोयल 

परभणी जिल्ह्यात सर्वच प्रमुख पदांवर सध्या महिला अधिकारी असल्याचा आनंद आहे. अजून नूतन पोलीस अधीक्षक रुजू झालेल्या नाहीत परंतु त्या येत आहेत त्याचाही आनंद आहे. सर्वच महिला असल्याने अधिक संवेदनशीलतेने काम करता येईल. ज्यातून जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेऊ आणि जिल्हा प्रत्येक गोष्टीत अग्रेसर कसा होईल याकडे आमचा भर असेल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ब्रेकिंग महाराष्ट्र शी बोलतांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!