– परतीच्या पावसाने हाहाकार, सोयाबीन, भुईमूग, कापूस पिकांची अतोनात नासाडी
– बाणगंगा, पैनगंगा, अमना, भोगवती नद्या कोपल्या, शेतात पाणी घेऊन घुसल्या, पिके वाहून नेली
एकनाथ माळेकर
बुलढाणा/चिखली – चिखली तालुक्यासह धाड, साखरखेर्डा, मिसाळवाडी, अमोना, देऊळगावराजा परिसरात पावसाने थैमान घातले असून, काल रात्रीच्या मुसळधार पावसाने शेतीपिकांसह जनजीवनदेखील विस्कळीत झाले होते. बाणगंगा, अमना, भोगवती, पैनगंगा या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसून उरले सुरले सोयाबीन पीकदेखील मुळासकट वाहून गेले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, सोयाबीन, भुईमूग, कपाशी ही पिके ९० टक्क्यांच्या जवळपास नष्ट झाल्याने जिल्ह्यात आता ओला दुष्काळ जाहीर करणेच गरजेचे आहे. दरम्यान, चिखलीचे माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी आज जिल्हाधिकारी यांना फोन लावून तातडीने मदत कार्य व पंचनामे करावेत व शासनाच्या लक्षात परिस्थितीचे गांभीर्य आणून द्यावे, अशी सूचना त्यांना केली आहे. जिल्हाधिकारी यांनीदेखील याबाबत तहसीलदारांची बैठक घेतली असून, त्यांना सूचना दिल्या असल्याचे व महसूल प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणत असल्याचे त्यांना सांगितले आहे.
बुलढाणा तालुक्यासह धाड परिसरात परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बाणगंगा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी शेतात घुसले आहे. सोयाबीन, मका, आदी पिके जागेवर सडू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून धाडसह जामठी, वरूड, सोयगाव, मासरूळ, धामणगाव, टाकळी, कुंभेफळ, सातगाव, चांडोळ भागात खरीपाचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना, वीजपुरवठाही दोन दोन दिवस बंद राहात असल्याने, ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. साखरखेर्डा उपकेंद्र सतत बंद पडत असून, २४ ते ३६ वेळा वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. चिखली व बुलढाणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहात असून, नदीच्या पुराने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. हातणी येथील पुलावरून सहा ते सात फुटाने पाणी वाहत असल्याने चिखली-बुलढाणा मार्ग बंद पडला होता. पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती. दुधा, ब्रम्हपुरी, कल्याणा, उसरण, नागझरी, बाभुळखेड, मेहकर, परतापूर, अंत्री देशमुख, बोरी, सोनाटी आदी गावांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या शेतांत पुराचे पाणी घुसलेले असून, सोयाबीनचे उरले सुरले पीकही मुळासकट वाहून चालले आहे. देऊळगावराजा तालुक्यातही परतीचा पावसाचा धुमाकूळ कायम होता. जुमंडा व भिवगाव या गावातून जाणार्या अमना नदीला पूर आला असून, पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहात होते. त्यामुळे देऊळगावराजाकडची वाहतूक ठप्प पडली होती
साखरखेर्डा परिसरातील भोगवती नदीला देखील पूर आलेला असून, परिसरातील सोयाबीनचे ९० टक्केपेक्षा जास्त पीक वाया गेले आहे. सतत पाऊस पडत असल्याने सोयाबीन खाली पडून सडू लागले आहे. त्याला कोंब फुटायला लागले आहे. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, भुईमूग ही पिके नामशेष झाली असून, कपाशी, मका, मोसंबी, बाजरी ही पिके आडवी झाली आहेत. शेतकर्यांच्या शेतात कंबरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे बनलेले आहे. जिल्ह्यात काल व परवा रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता. शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, बुलडाणा, चिखली, लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शेतकर्यांनी शेतात कापून ठेवलेले सोयाबीन यामुळे पूर्णत: भिजले असून, शेतकरी मात्र या पावसाने उदध्वस्त झाले आहेत.
————–