एसटी महामंडळामध्ये नियुक्तीसाठी 2019 चालक तथा वाहक सरळसेवा भरतीमधील पात्र उमेदवारांचे आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन, आमरण उपोषण सुरू
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) : चालक तथा वाहक सरळ सेवा भरती 2019 वरील स्थगिती उठवून, कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणारी 5 हजार पदांच्या प्रक्रियेचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करू, असा इशारा शेखर चेन्ने उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांना चालक तथा वाहक सरळ सेवा भरती 2019 मधील पात्र उमेदवारांनी 6 सप्टेंबर रोजी दिला होता. मात्र या निवेदनाची महाराष्ट्र राज्य परिवहन महांडळाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दिलेल्या निवेदनानुसार आज 26 सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या पात्र उमेदवारांनी घेतला आहे. तर तत्कालीन आणि सध्याचे मुख्यमंत्री आणि परिहवन मंत्री फक्त आश्वासन देतात मात्र काम कोणी करत नाही असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.तसेच सरकार विरुध्द घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,कार्यालयाने 2019 मधे सरळ सेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्या संदर्भात प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागवून कार्यपद्धतीने सर्व निवडीचे निकष लावून राज्यातील सर्व विभागाची चालक तथा वाहक अंतिम निवड यादी लावून काही उमेदवाराचे सेवा पूर्व प्रशिक्षण ही पूर्ण करून घेतलेले आहे. परंतु राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यानंतर राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर 05 जुलै 2021 ला पात्र उमेदवारांनी विभाग नियंत्रण कार्यालय यांच्यामार्फत विनंती केली होती की, ज्या उमेदवाराचे सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशा उमेदवाराची अंतिम वाहन चाचणी (MEO test) पूर्ण करून घ्यावी आणि त्यांना नियुक्ती द्याव्या, परंतु यावर काहीच उत्तर मिळाले नाही त्यानंतर रा.म.प कर्मचाऱ्यांचा काही मागण्यासाठी संप सुरू झाला आणि हा संप मागे घेण्यास कर्मचारी तयार नसताना विभाग नियंत्रक यांना विनंती केली की आमची राहिलेले प्रक्रिया पूर्ण करून (MEO test)आम्हाला महामंडळाच्या हलाखीच्या काळात सेवेची संधी द्यावी परंतु आपण तसे न करता आम्हाला डावलून बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राट पद्धतीने चालक नेमले. सद्यस्थितीला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रा.प.म.चे सर्व कर्मचारी कर्तव्यावर आले असल्याने सर्व वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नेमलेले कंत्राटी कर्मचारी बंद करण्यास संदेश प्रसारित केला. असून त्यावर अंमलबजावणी झाली आहे परंतु महामंडळाने 2019 साली सरळ सेवा भरती करून पात्र उमेदवारांची निवड करून ठेवली आहे. मात्र प्रशिक्षण सुरू होण्यासंदर्भात वाट पाहत आहे परंतु या पात्र उमेदवारांचा विचार न करता पुन्हा एस टी महामंडळामध्ये 5 हजार कंत्राटी चालक नेमण्यासंदर्भात मनुष्यबळ पुरवठा कंपन्याकडून ई – टेंडर मागितलेले आहे. यामुळे आमची मागणी आहे की 5 हजार कंत्राटी चालक नेमण्याचा निर्णय मागे त्वरित घ्या आणि त्या संदर्भात आपल्या कार्यालयातून संदेश प्रसारित करा, तसे आम्हाला ही कळवा आणि सरळ सेवा भरती 2019 वरील स्थगिती मागे घ्या, अन्यथा असे न झाल्यास सर्व विभागातील पात्र उमेदवार तसेच इतर सर्व विभागातील सरळ सेवा भरतीतील नियुक्ती वाचून बाकी राहिलेले निवड झालेले उमेदवार आझाद मैदान मुंबई येथे मरेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री , परिवहन मंत्री, मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थपकीय संचालक यांना निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना सुद्धा पाठविण्यात आल्या आहे.
मात्र या निगरगठ्ठ शिंदे -फडणवीस सरकारने तसेच परिवहन मंत्री व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोणतीही दखल घेतली नाही. वाढती बेरोजगारी पाहता या पात्र उमेदवारांवर व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली असून ते आर्थिक संकटात सापडले आहे. सरकार व प्रशासन कोणतीही घेत नसल्याने या पात्र उमेदवारांनी 26 सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन व आमरण उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत अन्नत्याग आंदोलन व आमरण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा या पात्र उमेदवारांनी घेतला आहे.
या आमरण उपोषणात अर्जुन खंडागळे, मधुकर शिंगारे, पंढरी वायाळ, विठ्ठल केदार, अरुण शेळके, शरद घुगे, प्रवीण शेंडे, गणेश चेंडाळणे, स्वप्निल शेळके, गणेश सपकाळ, भागवत हुडेकर, संतोष डांगे, मोहन पायघन, लक्ष्मण मगरे, योगेश भोकरे, सुनील बोरकर , यांच्यासह कोल्हापूर, सोलापूर, बीड, चाळीसगाव, बुलढाणा, बीड यासह सर्व जिल्ह्यातील पात्र 2000 च्यावर उमेदवार सहभागी झाले आहे.