-ओबीसी १७, अनुसूचित जाती १३; 4 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव
-३४ जागा सर्वसाधारण गटासाठी सुटल्या
-देऊळगाव माळी महिला (सर्वसाधारण), अंचरवाडी ओबीसी, देऊळगाव मही (अनुसूचित जाती महिला)
-जिल्हा परिषदेतील प्रस्थापित राजकारण्यांचा धक्का
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या आज 28 जुलै रोजी 68 जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्यासह तहसिलदार रुपेश खंडारे यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते. या आरक्षण सोडतीत प्रस्थापित राजकारण्यांचा जोरदार धक्का बसला असल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर मासरुळ जिल्हा परिषद जिल्ह्यात खूप प्रतिष्ठेची ठरणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडीयावर रंगल्या आहेत.
वाढलेल्या अंचरवाडी गटाचे आरक्षण ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) निघाल्याने अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या गटातून मिसाळवाडीचे सरपंच विनोद तथा बाळू पाटील हे इच्छूक असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या शिवाय, देऊळगाव माळी गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले असून, तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वडतकर यांच्या पत्नी सौ. मालताताई संजय वडतकर या निवडणूक लढवू शकतात, तर संजय वडतकर हे नजीकच्या कळंबेश्वर गटातून निवडणूक लढवू शकतात. हे दोन्ही गट वडतकर यांचे बालेकिल्ले मानले जात आहे. या गटांत त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. एकूण या आरक्षण सोडतीत ओबीसींसाठी १७ जागा राखीव असून, १३ जागा अनुसूचित जाती तर ४ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तर ३४ जागा या खुल्या गटासाठी सुटलेल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी, भाजप व शिवसेना आणि शिवसेनेचा शिंदे गट अशा दुहेरी लढती रंगण्याची शक्यता असून, यावेळेस अभूतपूर्व बंडखोरी होईल, असा अंदाज राजकीय प्रस्थापित व्यक्त करत आहेत. जिल्ह्याचे नेते म्हणून खासदार प्रतापराव जाधव व माजी मंत्री आ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
मासरुळ जि.प.सर्कलकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार..
संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेल्या मासरुळ जिल्हा परिषदमध्ये आरक्षण सर्वसाधारण महिला निघाले आहे. या सर्कलमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, काँग्रेसचे गजानन लांडे पाटील हे आपल्या सुविद्य पत्नींना निवडणूक रिंगणात उतरविणार आहे. परंतु सध्या शिवसेनेमध्ये उध्दव ठाकरे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे दोन गट पडल्याने शिवसेनेचे जालिंधर बुधवत यांना रोखण्यासाठी खा.प्रतापराव जाधव, माजी आ.विजयराज शिंदे हे जोरदार प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात असून त्याला आ.संजय गायकवाड यांच्या बुलडाणा मतदार संघातील 1 पं.स.गण व भाजपाच्या आमदार सौ.श्चेताताई महाले पाटील यांच्या मतदार संघातील एका पं.स.गणाचा फायदा भाजपाच्या संभाव्य उमेदवार सौ.उत्कर्षा देशमुख यांना होणार आहे. तर यावेळी शिंदे गटामुळे जालींधर बुधवत यांच्या पत्नी सौ.कमलताई बुधवत यांच्यापुढे एक मोठे आव्हान उभे राहणार असून उध्दव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक कुणीकडे कल देतात हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. राकाँ.चे मनोज दांडगे यांच्या सुविद्य पत्नी सौ.निताताई दांडगे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर काँग्रेसकडून गजानन लांडे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ.ज्योतीताई लांडे पाटील निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा असून मासरुळ जि.प.गटामध्ये कोणाचे पारडे जड ठरेल हे सांगणे आज जरी कठीण असले तरी शिवसेनेला रोखण्यासाठी दोन विद्यमान आमदार, एक माजी आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यामुळे सौ.उत्कर्षा देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक फायद्याची ठरणार असल्याचा अंदाज बांधल्या जात आहे.
असे निघाले जिल्हा परिषदेचे गटाचे आरक्षण
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडूक 2022 करीता गुरुवार 28 जुलै रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये तेरा सर्कलमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण निघाले असून यामध्ये 7 गटामध्ये महिलांना प्राध्यान्य मिळाले आहे. तर अनुसूचित जमातीमध्ये 4 गटापैकी दोन गटामध्ये महिला राखीव, ओबीसीमध्ये 17 जागांचे आरक्षण जाहीर झाले असून त्यामध्ये 9 महिलांसाठी राखीव आहेत. तर 34 गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण निघाले असून त्यामध्ये 16 गटामध्ये महिलासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मोताळा तालुक्यात ‘कही खुशी कही गम’
मोताळा- संपूर्ण मोताळा तालुक्याच्या नजरा लागलेल्या मोताळा तालुक्यातील पंचायत समितीच्या 10 गणाचे व 5 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण आज 28 जुलै रोजी जाहीर करण्यात आले. सदरचे आरक्षण पाहता दिग्गजांच्या अपेक्षांवर पाणी फिरविले असल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. पं.स.मोताळा येथे निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार सरिका भगत व गटविकास अधिकारी अरुण मोहोळ यांच्या उपस्थीतीत आज गुरुवार 28 जुलै रोजी 10 पं.स.गणाचे आरक्षण काढण्यात काढण्यात आले. यामध्ये पिं.गवळी पं.स.गणामध्ये सर्वसाधारण, धा.बढे सर्वसाधारण, पोफळी अनुसूचित जाती(राखीव), राजूर ओबीसी महिला प्रवर्गासाठी, तरोडा सर्वसाधारण महिला, कोथळी सर्वसाधारण, सारोळा मारोती सर्वसाधारण महिला, तळणी अनुसूचित जाती(राखीव), लिहा ओबीसी प्रवर्गासाठी, रोहिणखेड अनुसूचित जमाती प्रवार्गासाठी असे आरक्षण निघाले.
असे आहे जि.प.गटाचे आरक्षण
मोताळा तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट असून यामध्ये रोहिणखेड-सारोळा मारोती अनुसूचित जातीसाठी राखीव, धा.बढे सर्कलमध्ये नामाप्र.राखीव, कोथळी-पोफळी सर्कलमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव, तरोडा-राजूर सर्कलमध्ये सर्वसाधारणसाठी राखीव, तळणी-पिं.गवळी सर्कलमध्ये नामाप्र.साठी राखीव असे आरक्षण निघाले आहे.
आरक्षण सोडतीची यादी खालीलप्रमाण आहे –
यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..