बिबी (ऋषी दंदाले) – समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी, ट्रक, ट्रेलर यांचे सामान चोरी करणार्या एका अट्टल चोरट्यास बिबी पोलिसांनी ठाणेदार संदीप पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिस कसून तपास करत आहेत. या महामार्गावरील डिझेल चोरट्यांचे सिंघम ठाणेदार संदीप पाटील यांनी चांगलेच कंबरडे मोडले असल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर असे, की बिबी पोलिस ठाण्यात दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादी जितेंद्र रामअजारे प्रजापती (वय २८) रा. बदीहारी पो. कोल्हयी ता. जि. महाराजगंज उत्तरप्रदेश यांनी तोंडी रिपोर्ट दिला होता, की दिनांक १२ ऑगस्ट २०२४ चे रात्री एक वाजेच्या सुमारास ते स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर चेनेज क्रमांक ३११ वर असलेल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपावर असलेल्या सर्विस रोडवर ट्रक उभा करुन आराम करित असतांना रात्रीदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे ट्रेलर क्रमांक एमएच १४ एलबी ९०३९ची जे.के. कंपनीची स्टेफनी किमत ३० हजार रूपये चोरून नेली, अशा रिपोर्टवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात दिनांक २८ सप्टेंबररोजी आरोपी कृष्णा कौतीकराव भांबळे (वय १८) रा. डौलखेडा, ता. जाप्रâाबाद जि. जालना यास निष्पन्न करून अटक करण्यात आली. त्याच्याकडून सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विप्ट डिझायर कार क्रमांक एमएच ०१ बी.एफ.०३०७ किमती ३ लाख रुपयाची जप्त करुन गुन्हा उघड केला आहे. ही कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात खामगाव, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो स्टे बिबीचे ठाणेदार संदीप पाटील, परमेश्वर शिदे, चालक पो हे कों अशोक अंभोरे, नापोकों अरूण सानप, पोर्को रविंद्र बोरे, चापोकों जुबेर प्यारीवाले यांनी केली आहे.