– शेतकर्यांना हक्क मिळवून देण्यासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी मत देण्याचे आवाहन
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार तसेच शेतकरी संघटना क्रांतीकारी पुरस्कृत शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी पायाला भोवरा बांधल्यागत मतदारसंघातील गावांना भेटी देणे सुरू केले असून, त्यांचे जोरदार स्वागत गावोगावी होत आहे. शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित आघाडीचे पदाधिकारी व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते त्यांच्या गावभेट दौर्यांत सहभागी होत असून, ऋतुजाताईंच्या या दौर्यामुळे गावोगावी जोरदार लाट निर्माण झाली आहे. शेतकर्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, तसेच मेहकर व लोणार तालुक्यांच्या विकासासाठी मला मत द्या, असे आवाहन डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी केले आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकर्यांना पीकविमा नाही. हे सरकार शेतकर्यांचे शत्रू असून, हे सरकार हटवून बळीराजाचे राज्य आणण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी या गावभेट दौर्यांत केले असता, ताई तुम्हाला बहुमतानेच विधानसभेत पाठवू, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार व मित्र पक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या गावभेटी दौर्याला वेग आला असून, मादणी, आरेगाव, जवळा, हिवरा साबळे, अंजनी बु. नागापूर, डोणगांव, गोहागांव दांदडे, बेलगांव, पांगरखेड, विठ्ठलवाडी, जनुन , चिंचाळा, राजगड, विश्वी या संपूर्ण गावांमध्ये डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या गावभेट दौर्याला जोरदार प्रतिसाद लाभला. गावागावामध्ये ताईचे स्वागत करण्यात आले व ग्रामस्थांमधून एकच सूर दिसून आला, ऋतुजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. यंदा वंचित बहुजन आघाडीचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र मतदारसंघात हळूहळू दिसत आहे. तसेच, काल जुनी मादनी, नवी मादनी, आरेगाव, जवळा, हिवरा, साबळे, नागपूर, गोहगाव, दांदडे, पांगरखेड, राजगड, बेळगाव, चिंचाळा या गावांचा दौरा केला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कापूस व सोयाबीनप्रश्नी डॉ. ऋतुजाताई चव्हाण आक्रमक!
सद्या कापूस व सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. मातीमोल भावात सोयाबीन विकावी लागत आहे. शेतकर्यांच्या सोयाबीनला भाव देण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही. त्यामुळे शेतकर्यांना कुणीच वाली उरलेला नाही. कापूस, सोयाबीन या पिकांना हमीभाव मिळवून देण्यासाठी तसेच हक्काचा पीकविम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, या मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका, असे आवाहनही डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांनी याप्रसंगी केले आहे.
सोयाबीनला ४८९२ रूपयांचा हमीभाव पण भावाची ‘हमी’ नाही!