सोयाबीनला ४८९२ रूपयांचा हमीभाव पण भावाची ‘हमी’ नाही!
- व्यापार्याकडून मातीमोल भावात खरेदी; डोळ्यादेखत शेतकरी 'लुटला' जात असताना बाजार समित्या 'गप्प'!
– जिल्ह्यात ‘नाफेड’ची महिन्यात अवघी २०० क्विंटल खरेदी
– राजकारणी निवडणुकीत व्यस्त, शेतकरी नेत्यांनीही मूग गिळले; शेतकरी मात्र त्रस्त!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शासनाने सोयाबीनला ४८९२ रूपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजार समितीमध्ये २८०० ते ४००० हजार रूपये प्रतिक्विंटल अशा भावात सोयाबीन खरेदी केली जात असून, व्यापार्याकडून एक प्रकारे शेतकर्यांची लूट सुरू आहे, असे असताना बाजार समितीतील पदाधिकारी मात्र डोळ्यादेखत शेतकरी लुटला जात असताना मजा पाहत आहेत का, असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील नाफेडच्या १७ खरेदी केंद्रांवर महिनाभरात सोयाबीनची अंदाजे दिडशे ते दोनशे क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. राजकारणी निवडणुकीचे कारण पुढे करत व्यस्त असल्याने शेतकर्यांच्या समस्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने तो त्रस्त झाला आहे.
गेल्यावर्षी अतिपावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे खर्चही वसूल झाला नसल्याने तो अतिशय मेटाकुटीला आला होता. यावर्षीही खरीप हंगामात सुरुवातीला पाऊस नव्हता तर गेल्या सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याला अतिवृष्टीने चांगलेच झोडपून काढले. यामुळे दोन लाखांच्यावर हेक्टरवरील पीक नेस्तनाबूत झाले, तर राहिलेल्या सोयाबीनला एकरी दोन ते तीन पोत्याची झडती लागली. कपाशीलाही विविध रोगांनी ग्रासले तर उडीद, मूग डाळीलाही झाले नाहीत. सदर नुकसानीचा कृषी विभागाकडून सर्वे करण्यात आला, परंतु अद्याप ‘छदामही’ मदत शेतकर्यांना मिळाली नाही, तर पीकविम्याच्या मोबदल्याची शेतकरी वाट पाहत आहेत. शासनाने यावर्षी सोयाबीनला ४८९२ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु बाजार समितीमध्ये सोयाबीनमध्ये ‘आर्द्रता’ जास्त असल्याचे कारण पुढे करत शेतकर्यांची सोयाबीन मातीमोल भावात खरेदी करण्यात येत आहे. यामुळे सणासुदीच्या काळात शेतकर्यांचे दिवाळे काढले जात आहे. असे असताना बाजार समितीतील पदाधिकारी, अधिकारी मात्र हा प्रकार उघड्या डोळ्यानी पाहात असून, यावर ‘ब्र’ शब्दही काढायला कुणी तयार नाही. बाजार समितीत दररोज हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी केली जात असून, २८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल इतका कमी भाव मिळत आहे. काल, दि. ६ ऑक्टोबररोजी खामगाव बाजार समितीत सोयाबीन घेऊन शेकडो वाहने आल्याने, काही काळ बाजार समिती समोरील रोडवर ट्रॅफिक बराच वेळ जाम झाली होती. वास्तविक केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ४८९२ रूपये प्रतिक्विंटल या हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी करताच येत नाही. परंतु संबंधित व्यापार्याकडून माल खरेदी करताना, आर्द्रताचे कारण पुढे करत, याबाबत माझी काही तक्रार नाही, अशा छापील पावतीवर शेतकर्यांनी सही घेतली जात असल्याची माहिती आहे. बहुतांश शेतकरी अशिक्षित, त्यापेक्षाही गरजवंत असल्याने, याचाही फायदा मोठ्या प्रमाणात व्यापारी घेताना दिसत आहेत. दुसरीकडे, जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून नाफडने सोयाबीन खरेदी सुरू केली आहे, परंतु इकडेही आर्द्रतेचेच असल्याचे कारण सांगत खरेदी झाली नसून, आज, दि. ७ ऑक्टोबररोजी साखरखेर्डासह काही खरेदी केंद्रावर अवघी दिडशे ते दोनशे क्विंटलचे आसपास सोयाबीन खरेदी झाल्याची माहिती मिळाली असून, आता सोयाबीनमधील आर्द्रता कमी झाल्याने खरेदी वाढणार असल्याची आशा आहे. चोहीकडून शेतकरी भरडला जात असताना, राजकारणी मात्र विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत, व्यस्त दाखवत असल्याने आमचा वाली कोण, असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. शेतकर्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल सुकवून आणावा, म्हणजे आर्द्रता कमी येईल, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.
——
केंद्रीय कृषी आयुक्तालयाची टीम विदर्भ दौर्यावर!
विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावतीसह काही जिल्ह्यातील खरेदीबाबत तक्रारी असल्याने केंद्रीय कृषी आयुक्तालयाची टीम या जिल्ह्याचा दौरा करत असून, शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत असल्याची माहिती मिळाली आहे.