महाआघाडीचे सरकार निवडून द्या, कर्जमाफी करू, शेतमालाचे भाव स्थीर ठेवू – उध्दव ठाकरे
- ऐपत नसतानाही तुला आमदार केलं, संजय रायमुलकरांवर नामोल्लेख टाळून डागले टीकास्त्र
– आ. शिंगणे वेळीच महाआघाडीत असते तर लोकसभेला शिवसैनिकांनीही दाखवला असता ‘प्रताप’!
– पडलेल्या शेतमालाच्या भावाबद्दल ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताचीही घेतली दाखल!
लोणार/बुलढाणा (बाळू वानखेडे) – सध्याच्या सरकारच्या काळात अदाणी व खोकेबाज आणखी मालामाल होत असून, शेतकर्यांचा मालाला मात्र कवडीमोल भाव आहे. ही परिस्थिती पूर्वपदार आणायची असेल तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणा, सरकार आल्यावर शेतमालाचे भाव स्थीर ठेवू व शेतकर्यांना कर्जमाफीही देऊ, अशी ग्वाही शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. विशेष म्हणजे, शेतमालाच्या पडलेल्या भावाबद्दल ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वस्तूनिष्ठ बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत, ठाकरे यांनी शेतमालाच्या भावावर भाष्य केले. यावेळी त्यांनी मेहकरचे आमदार संजय रायमुलकर व खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर नामोल्लेख टाळून जोरदार टीकास्त्र डागले. कोणतीही ऐपत नसताना, केवळ शिवसेनेच्या तिकिटावर इथला आमदार निवडून आला. पण खोके घेऊन गद्दारी करत आपल्यालाच धोका दिला, अशा आमदाराला आता घरी पाठवायची वेळ आली आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. आ. डॉ. राजेंद्र शिंगणे थोडे लवकर महाविकास आघाडीत आले असते, तर शिवसैनिकांनीही ‘प्रताप’ दाखवला असता, अशी खंतही त्यांनी लोकसभेची जागा हातातून गेल्याबद्दल व्यक्त केली.
महाविकास आघाडीचे मेहकरचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारार्थ आयोजित लोणार येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. डॉ .राजेंद्र शिंगणे हे होते. यावेळी खा. अरविंद सावंत, आ.मिलिंद नार्वेकर, युवा नेते तेजस ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, माजी मंत्री सुबोध सावजी, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, महिला आघाडी प्रमुख जिजा राठोड, छगन मेहत्रे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर, आशीष राहाटे, प्रा. गोपाल बछीरे, किशोर गारोळे, निंबाजी पांडव, दिलीप वाघ, कासम गवळी, अनंतराव वानखडे, लक्ष्मणराव घुमरेसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, सध्या समाजात विभागणी करण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत पराभव होताच सत्ताधार्यांना लाडकी बहीण आठवली असे सांगत यापूर्वीच आघाडीत असतो तर नरेंद्र खेडेकर लाखाच्यावर मतांनी विजयी झाले असते, अशी खंत यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री सुबोध सावजी, श्याम उमाळकर, लक्ष्मणराव घुमरेसह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी अजिम नवाज राही तर उपस्थितांचे आभार गजानन खरात यांनी मानले. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.