एक इंचही शेती व जमीन ठेवली नसल्याचे सांगणारे राहुल बोंद्रे त्यांच्या शपथपत्रातूनच तोंडावर आपटले!
- राहुल बोंद्रे व परिवाराकडे तब्बल २६.११ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता; गेल्या पाच वर्षांत मालमत्तेत तब्बल ३१० टक्क्यांनी वाढ
– लोकांना खोटे पण रेटून बोलणार्या राहुल बोंद्रेंना आता मतदारच धडा शिकविण्याच्या मूडमध्ये?
चिखली (तालुका प्रतिनिधी) – ताई आणि साहेबांनी माझ्या तर सर्व प्रॉपर्टीवर आरक्षण टाकले आहे. एक इंचही शेती व जमीन ठेवली नाही, सध्या मी भूमिहीन झालो आहे, असे सांगणारे चिखली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे काँग्रेसचे उमेदवार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना त्यांनीच निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्राने तोंडावर पाडले आहे. राहुल बोंद्रे यांच्यासह परिवाराकडे तब्बल २६ कोटी ११ लाख १९ हजार ८८२ रूपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असल्याचेही त्यांच्या शपथपत्रातून समोर आले आहे.
राहुल बोंद्रे यांचे शपथपत्र वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे भाषण म्हणजे, लोकांसाठी निव्वळ गंमत असते. ते काय ठोकून देतील ते सांगता येत नाही. आपला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राहुल बोंद्रे यांनी जोरदार भाषण ठोकले होते. ते म्हणाले होते, की या ताई आणि साहेबांनी माझ्या तर सर्व प्रॉपर्टीवर आरक्षण टाकले आहे. एक इंचही शेती व जमीन ठेवली नाही, सध्या मी भूमिहीन झालो आहे. याचवेळी या मंचावर बसलेले भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांचे नाव घेऊन, भाई तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला मला बोलवा. मी आता भूमीहीन झालो आहे. आता माझ्याकडे एक इंचही जमीन झालेली नाही. अशा शब्दांत राहुल बोंद्रे यांनी भावनिक भाषण करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. लोकांनाही बोंद्रे यांचे बोलणे खरे वाटले. परंतु, राहुल बोंद्रे यांच्याकडे एक इंचही जमीन नाही, हे त्यांचे म्हणणे त्यांनीच दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्राने खोडून काढत, त्यांना चांगलेच तोंडावर पाडले. या शपथपत्रानुसार, राहुल बोंद्रे यांनी सन २०१९ मध्ये दिलेले शपथपत्र आणि २०२४ मध्ये दिलेले शपथपत्र याची तुलना केली असता, त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत ३१० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. २०१९ च्या शपथपत्रांमध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जंगल मालमत्ता दोन कोटी १६ लाख २९ हजार सत्तावीस रूपये दाखवली होती, तर २०२४ च्या शपथपत्रात जंगम मालमत्ता पाच कोटी ६१ लाख २४ हजार ६१२ दाखवली आहे. त्यामध्ये या पाच वर्षाच्या कालावधी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३ कोटी ४४ लाख ९५ हजार ५८५ रूपयांची वाढ झाली आहे, तर २०१९ च्या शपथपत्रात स्थावर मालमत्तेमध्ये त्यांनी सहा कोटी नऊ लाख ९७ हजार पाचशे रूपये दाखवले होते ते आता २०२४ च्या शपथपत्रात २० कोटी ४९ लाख ९५ हजार २७० दाखवलेले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये १४ कोटी ३९ लाख ९७ हजार ७७० रुपयाची वाढ झालेली आहे. जंगम आणि स्थावर मालमत्तेमध्ये तब्बल १७ कोटी ८४ लाख ९३ हजार ३५५ रुपयाची वाढ झाली आहे. २०१९ च्या शपथपत्रातील जंगम व स्थावर मालमत्ता ८ कोटी २६ लाखांवरून २०२४ च्या शपथपत्रात ती २६ कोटी ११ लाख १९ हजार ८८२ अशी झाली आहे. ही वाढ टक्केवारीत मोजल्यास पाच वर्षात राहुल बोंद्रे यांच्या संपत्तीमध्ये ३१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शपथपत्रावर राहुल बोंद्रे हे ३१० टक्के वाढ झाल्याचे शपथेवर लिहून देतात, तेच राहुल बोंद्रे हे त्याच शपथपत्रासह अर्ज भरतेवेळी जनतेसमोर मात्र माझ्याकडे एक इंचही शेतजमीन नसल्याचे जाहीर सांगून, सर्रास खोटे बोलून लोकांना वेड्यात काढतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे राहुल बोंद्रे यांचा खोटारडेपणा पाहता, त्यांना या विधानसभा निवडणुकीत जनताच चांगलीच तोंडघशी पाडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
—-