राजेंद्र काळे
सिंदखेडराजा : पत्रकारिता करताना केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल ‘पुण्यनगरी’चे आवृत्ती प्रमुख अनिल मस्के पाटील यांचा राजे लखुजी जाधव पुरस्काराने राजमाता जिजाऊ माँ साहेब जन्मस्थळ असणाऱ्या राजवाड्यांसमोरील सावता माळी सभामंडपात ‘राजेशाही’ सोहळ्यातून सन्मान करण्यात आला. हा सोहळा आज सोमवार 25 जुलै रोजी संपन्न झाला.
राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज असलेल्या राजे जाधव परिवार तसेच राजे लखुजीराव जाधव शिक्षण संस्था सिंदखेड राजा व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राजे लखुजीराव जाधव स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार शिवाजी राजेजाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी राजे लखुजीराव जाधव स्मृतीनदिन व जाधव कुळ मेळाव्याचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी दै. ‘पुण्य नगरी’चे आवृत्ती प्रमुख अनिल म्हस्के यांना या पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे वडिल व राजेजाधव घराण्याचे मुळपुरुष तथा प्रेरणास्थान राजे लखुजीराव जाधव यांच्या सिंदखेड राजा येथील समाधीस्थळी त्यांच्या ३९३ व्या स्मृतीदिनानिमित्त मावळ्यांच्या जाज्वल्य, प्रेरक इतिहासाचे स्मरण करण्यासाठी २५ जुलै रोजी राजे लखुजीराव भैय्यासाहेब जाधवराव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केल्या गेले. दै. ‘पुण्य नगरी’चे अकोला, वाशिम, बुलडाणा आवृत्तीप्रमुख अनिल म्हस्के यांना राजे लखुजीराव जाधव स्मृती पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, लिज्जत पापड उद्योग समुहाचे एमडी सुरेशराव कोते, प्रसिद्ध शिवशाहीर यशवंतराव गोसावी, उद्योजक विजयसिंग राजेजाधव यांचा देखील सत्कार करण्यात आला.