– दानवे आणि खोतकरांमध्ये दिलजमाई
– जालन्यात शिवसेनेला सुरुंग
नवी दिल्ली/जालना (जिल्हा प्रतिनिधी) – माजी मंत्री तथा शिवसेनेचे जालन्यातील आक्रमक नेतृत्व अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात अखेर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत खोतकर हे शिंदे गटात आले. दरम्यान, यावेळी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा एकत्र आले आहे. खाेतकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या संपर्क दौर्याची जोरदार भलावन करणारे खोतकर अचानक शिंदे गटात आल्याने जालन्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपण शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, असे सांगणारे खोतकर अखेर शिंदे गटात आल्याने आश्चर्यदेखील व्यक्त केले जात असून, त्यांनी शिवसेनेला सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे. अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे माझ्या संपर्कात असल्याचे खोतकर यांनी काही दिवसांपूर्वीच सांगून, खळबळ उडवली होती. शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा परत येतील, असा विश्वासदेखील खोतकर यांनी व्यक्त केला होता. परंतु, अचानक त्यांनी यू-टर्न घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचे राजकीय विरोधक केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपूर्वी खोतकर यांची ईडी चौकशी झाली होती, हे विशेष.
दरम्यान, ‘मी शिवसेना सोडली असं सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या आहेत. पण असं कुठेही काही घडलं नाही. मी आजही शिवसेनेत आहे, मी शिवसैनिक आहे, आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही आहे. मी आयुष्यभर शिवसेनेत राहणार आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले आहे.