पारनेर (प्रतिनिधी) : पारनेर शहरासह तालुक्याच्या अनेक गावांमधील घरगुती विज ग्राहकांना महावितरणने झटका दिला आहे. शेकडो ग्राहकांना ७० ते ८० हजार रूपयांची बिले पाठविण्यात आली असून ती वसुलीसाठी ग्राहकांच्या पाठीशी तगादा लावण्यात आला आहे. दरमहा २०० ते ३०० रूपये बिल भरणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे इतक्या मोठया रकमेचे बिल पाहून पांढरे पडले आहेत. दरम्यान, महावितरणच्या या पठाणी वसुलीविरोधात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे यांनी आवाज उठविला असून, महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे.
स्वतः जितेश सरडे यांनाही ७६ हजार रूपयांचे बिल प्राप्त झाले आहे. सरडे हे नियमित बिल भरतात. त्यांना दरमहा वापरानुसार ३०० ते ५०० रूपये घरगुती वीज वापराचे बील येते. बिल हाती पडल्यानंतर ते देखील चकीत झाले. त्यांच दरम्यान देवीभोयरे, निघोज, वडनेर बुद्रुक, पठारवाडी तसेच परिसरातून अशीच बिले आल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना धक्कादायक माहिती समजली. विजेचे मिटर रिडींग घेणारी एजन्सी बदलली असून त्यांनी दोन वर्षांच्या वापराइतकी बिले पाठविली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जर दोन वर्षांच्या वापराची बिले पाठविण्यात आली असतील तर सर्वच ग्राहकांना ७० ते ८० हजार प्रमाणे बिले मिळणे आवश्यक होते. त्यांनी अधिक चौकशी केली असता नव्या एजन्सीने मिटर रिडींग न घेताच बिले पाठविली असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, पारनेर शहरातील ग्राहकांनाही अशाच प्रकारे अव्वाच्या सव्वा बिले मिळाली असल्याची माहीती पुढे आली आहे.
विज बिले वाढीव आल्याने ग्राहक महावितरणच्या कार्यालयात गेले असता ते बिल तीस ते पस्तीस हजार रूपयांपर्यंत कमी करण्याची तयारी दर्शविली जाते. त्यानंतर हप्त्याने ही रक्कम जमा करण्यासाठी दबाव आणला जातो. विज जोड तोडला जाऊ नये म्हणून अनेक हातावर पोट असलेल्या ग्राहकांनी हप्ते पाडून घेत २ ते ३ हजार रूपयांचे हमे जमाही केल्याची माहिती सरडे यांना समजली. त्यानंतर संतप्त सरडे यांनी अधिका-यांना धारेवर धरीत ही पठाणी वसुली थांबविण्याची मागणी केली. अद्यापही महावितरणकडून या बिलांबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसून त्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
—
संपर्क करण्याचे जितेश सरडे यांचे आवाहन..
ज्या ग्राहकांना अशा प्रकारची बिले प्राप्त झाली आहेत, त्यांनी बिलांच्या झेरॉक्स प्रती २८ जुलै पर्यंत पारनेर व देवीभोयरे येथील आ. नीलेश लंके संपर्क कार्यालयात जमा करण्याचे आवाहन सरडे यांनी केले आहे. इतर माहीतीसाठी सरडे यांच्या मोबाईल क्रमांक ९१५८६८२८६६ वर संपर्क साधण्याचे सुचित करण्यात आले आहे.