नीलेश लंके निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!
– हेलिकॉप्टरमधुन फिरणारा खासदार पाहिजे, की जमिनीवर राहून सामांन्यांसाठी काम करणारा?
– बोधेगाव येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – मतदारसंघातले साधे प्रश्न ज्यांना सोडवता आले नाहीत, ते महाराष्ट्रातले काय भले करणार आहेत, काँग्रेसचे उपकार, केलेली कामे सोडून सत्तेच्या मोहापायी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, जे लोक तुमच्या आमच्यामध्ये प्रामाणिक राहू शकत नाही ते लोक निवडून आल्यावर तुमच्या-आमच्या बरोबर प्रामाणिक राहू शकतील का? असा सवाल करत नीलेश लंके निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुम्हाला हेलिकॉप्टरमधून फिरणारा खासदार पाहिजे की जमिनीवर राहून लोकांची कामे करणारा खासदार पाहिजेत? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते रोहित आरआर पाटील यांनी बोधेगाव येथील महाआघाडीच्या सांगता सभेत उपस्थित केला. बोधेगाव येथे शनिवारी लोकसभा निवडणुकीतील अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभा झाली. या सभेत रोहित पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, नीलेश लंके, नितीनराव काकडे, राजेंद्र दौंड, शिवसेनेचे रामदास गोल्हार, भारत लोहकरे, यशवंत गोसावी, माजी सभापती प्रकाश भोसले, फिरोजभाई पठाण, सुनिल रासने, उपसरपंच संग्राम काकडे, रामचंद्र कार्डिले, माणिक गर्जे, परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
रोहित पाटील म्हणाले, नीलेश लंकेचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, जनतेतील माणूस आहे तर त्यांच्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला नगर दक्षिणमध्ये यायची काय गरज भासली ? याचं उत्तर भाजपने देण्याची गरज आहे. हे लोकांच्या प्रश्नांवर बोलत नसून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून धर्माधर्मामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राला या अहमदनगर जिल्ह्याची दखल घ्यावी लागेल, कारण या जिल्ह्याने स्व. बाळासाहेब भारदे, मारूतराव घुले, आबासाहेब काकडे, स्व. बबनराव ढाकणे, डॉ. टी के पुरनाळे अशी तोलामोलाची माणसे दिली. त्यांच्या उपकारांतून परतफेड करायची असेल तर या निवडणुकीपेक्षा नामी संधी आपल्याला मिळणार नाही. केदारेश्वर कारखाना उभा करण्यासाठी स्व. बबनराव ढाकणे यांना शरदचंद्र पवार यांनी भरीव मदत केली. इथल्या अनेक चुलिंना न्याय देण्याचे काम पवारांनी केले आहे. त्यांच्या माध्यमांतून एक शाश्वत काम याठिकाणी उभा राहिले आहे. आता या कामाला अधिकचा पाठिंबा द्यायचा असेल तर महाराष्ट्राच्या साथीला शरदचंद्र पवारांसारखा कुठलाही माणूस नाही हे दिल्लीला ठणकावून सांगायची वेळ आली आहे.
महाराष्ट्रामध्ये आज कांदा उत्पादकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतांना, गुजरातला झुकतं माप देऊन कांदा निर्यातीला परवानगी दिली जाते, दूध उत्पादकांचे प्रश्न, दिल्लीच्या सीमेवर केले जाणार्या शेतकर्यांच्या आंदोलनाला आतंकवादी म्हणणे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचा घाट त्यांनी घातला असून सर्वसामान्यांचा यामध्ये कुठेच विचार केला जात नाही. त्यामुळे आपल्याला हेलिकॉप्टरमधून फिरणारा उमेदवार पाहिजे की, जमिनीवर राहून सामन्यासाठी काम करणारा माणूस पाहिजे, याचा निर्णय घेण्याची आज गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आज अखेर एक स्वप्न बघतोय की, महाराष्ट्रातून कुणीतरी उठावं, दिल्ली काबीज करावी, दिल्लीवरती राज्य करावं, शरदचंद्र पवारांच्या माध्यमांतून ही संधी मिळाली होती पण तानाजी मालुसरे म्हणून साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ म्हणून अनेकांनी पाय खेचण्याचे काम केले. आता निर्धार करण्याची गरज आहे, शरदचंद्र पवारांची मान दिल्लीमध्ये ताठ ठेवायची असेल तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त संख्येने पवारांच्या मागे खासदार उभे करण्याचा निर्धार सर्वांनी करणे अवश्यक आहे. फडणवीस सांगतात तुम्ही इथल्या स्थानिक उमेदवाराकडे पाहू नका, तर पंतप्रधान मोदींकडे पाहून मतदान करा, बैल बाजारात बैल खरेदी विक्री केली जाते, परंतु मालकाकडे बघून बैल खरेदी केल्याचे एकतरी उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहे का? उद्या महाराष्ट्रातले स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान इथं येणार आहेत का ? असा प्रतिप्रश्न रोहित पाटील यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाची यांच्यावर मेहेरबानी म्हणावी लागेल, प्रत्येक जिल्हयात जाऊन यांना सभा घ्याव्या लागतात आणि दोन-चार टप्पे निवडणूक आयोगाने वाढवले असते तर बोधेगावातदेखील यांनी मोदींची सभा घ्यायला मागेपुढे पाहिले नसते, इतकी दयनीय परिस्थिती यांच्या पक्षाची झाली आहे, अशी टीकाही रोहित पाटील यांनी केली. या सभेला उपस्थित सर्व स्थानिक नेत्यांचीही जोरदार भाषणे झालीत. सभेला विराट जनसागर लोटला होता.
————-